Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुंबईत लोकल बंद होणार नाही — वडेट्टीवार

 

 

मुंबई : वृत्तसंस्था ।  “लोकल बंद होणार नाही, पण त्यावर निर्बंध लावले जातील आणि त्याचं वेगळ्या पद्धतीने नियोजन केलं जाईल. गर्दी कमी करुन लोकांना सुविधा देण्यावर भर असेल,” असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

 

 

कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने ठाकरे सरकारने निर्बंध कडक करण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी महत्वाची बैठक बोलावली असून यावेळी राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान लोकल बंद होणार का हा प्रश्न मुंबईकरांना सतावत असून राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी  ही माहिती दिली आहे.

 

“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा काँग्रेस पक्षाचे प्रमुख या तिघांनी लॉकडाउनसंदर्भात विचार केलेला नाही. या सगळ्या परिस्थितीत अधिक कडक निर्बंध कसे लावता येतील यावर चर्चा होणार आहे. कालच यावर नव्याने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आमच्या विभागाकडून फाईल गेली आहे. अंतिम निर्णय आज संध्याकाळपर्यंत होईल,” अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

 

 

 

मुंबई लोकल बंद होणार का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “लोकलसंदर्भात मागील वर्षी आपण निर्णय घेतला होता. आपण विभागणी केली असून वेळेनुसार प्रवासाला मुभा दिली आहे. त्यामध्ये मग आरोग्य विभाग, रेस्तराँ, कर्मचारी, चाकरमानी यांचा समावेश होता. जी मागील वेळी उपाययोजना केली होती यावेळीही तशीच करणार आहोत”. यावेळी त्यांनी मुंबई लोकल बंद होणार नाही अशी माहिती दिली.

 

 

संक्रमणाचा वेग नियंत्रणात आणण्यासाठी काही कडक निर्बंध लागू केले जाऊ शकतात, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. “रेस्तराँ ५० टक्के क्षमतेनं सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्याचबरोबर लोक योग्य प्रतिसाद देत नसतील, तर धार्मिक प्रार्थनास्थळेही बंद करण्यात येतील,” असं महापौर म्हणाल्या.

 

“मुंबईतील लोकल प्रवासावरही निर्बंध आणले जाऊ शकतात. पूर्वीप्रमाणेच फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासासाची मूभा दिली जाऊ शकते. त्याचबरोबर   मॉल्स आणि थिअटर बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो,” असंही महापौर पेडणेकर यांनी यांनी सांगितलं.

 

 

दैनंदिन रुग्णवाढीने गुरुवारी नवा उच्चांक नोंदवला. गेल्या २४ तासांत राज्यात ४३,१८३ नव्या रुग्णांचे निदान झाले, तर २४९ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सर्वाधिक ८,६४६ नवे रुग्ण मुंबईत आढळले. राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ३,६६,५३३ झाली आहे. त्यातील सर्वाधिक ६४,५९९ रुग्ण पुण्यात  आहे.

Exit mobile version