Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

” मिसेस एशिया युनिव्हर्स ” मराठी तरुणी !

 

परभणी : प्रतिनिधी । जिंतूर शहरातील सामान्य कुटुंबातील लेक अंजली संपत कोला-पोर्जे ही मिसेस एशिया युनिव्हर्स ठरली आहे.

अंजली यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील ब्युटी पिजंट या स्पर्धेत पाचव्या श्रेणीत जगभरातून आलेल्या ६० विवाहित महिलांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. ही स्पर्धा राजस्थानमधील जयपूर येथे मिसेस युनिव्हर्स प्रा.लि. तर्फे आयोजित करण्यात आली होती. अंजली यांच्या या यशामुळे परभणीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

अंजली या परभणी जिल्ह्यीतील जिंतूर या छोट्याशा शहरातून आलेल्या आहेत. त्यांना लहानपणापासून फॅशन आणि डिझायनिंगमध्ये आवड होती. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण शहरातील एकलव्य बालविद्या मंदिर विद्यालयातून घेतले. तर उच्च माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी औरंगाबाद गाठले. या काळात त्यांनी आपला मॉडेलिंग, फॅशनिंगचा छंद जोपासला.

अंजली यांचे २००९ साली औरंगाबदमधील इंलेक्ट्रिकल इंजिनिअर संपत पोर्जे यांच्याशी लग्न झाले. अंजली यांना लहानपणापासूनच फॅशनिगं, मॉडेलिंग आणि डिझायनिंगची आवड असल्यामुळे लग्न झाल्यानंतर त्या हे छंद जोपासू शकतील का?, अशी शंका त्यांच्या मनात येत होती. मात्र, संपत यांनी त्यांची बायको म्हणजेच अंजली यांना प्रोत्साहन देत त्यांच्या स्वप्नांना बळ दिलं. आपल्या नवऱ्याच्या साथीनेच त्या हे यश संपादन करु शकल्या असं त्या सांगतात.

अंजली यांना फॅशन जगताची खूप आवड आहे. त्यांनी वयाच्या २१ व्या वर्षापासून मॉडेलिंग, फॅशन, ग्रुमिंग ट्रेनर आणि इव्हेन्टच्या क्षेत्रात पदार्पण केले. औरंगाबाद, पुणे, मुंबई, नाशिक आदी ठिकाणी ५० पेक्षा जास्त वेळा त्यांनी ब्युटी पिजंट स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून यशस्वी भूमिका त्यांनी पार पाडलेली आहे. बरं इथेच न थांबता त्यांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर सलग ८ महिने प्रयत्नांची पराकाष्ठा करुन राजस्थानमधील जयपूर येथे आयोजित केलेल्या ब्युटी पिजंट या स्पर्धेत भाग घेतला.

मिसेस युनिव्हर्स प्रा.लि.तर्फे ब्युटी पिजंट या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी त्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून स्पर्धेत आपले नाव निश्चित केले. या स्पर्धेत मिसेस युनिव्हर्सच्या पाचव्या श्रेणीत जगभरातून ६० विवाहित महिलांनी सहभाग नोंदविला होता. नंतर या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या ग्रँड फिनालेसाठी ५ महिलांची निवड करण्यात आली होती. या ५ महिलांमधून अव्वल ठरत अंजली यांनी ‘मिसेस एशिया युनिव्हर्स 2021’ चा क्राऊन माथी सजवून घेण्यात यश मिळवले.

Exit mobile version