Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मिलिंद कुळकर्णी यांना मूकनायक तर चंदू नेवे यांना जीवनगौरव पुरस्कार

 

जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने लोकमत जळगाव आवृत्तीचे संपादक मिलिंद कुळकर्णी यांना ‘मूकनायक’ तर जेष्ठ पत्रकार चंदू नेवे यांना जीवनगौरव पुरस्कार दि.२६ जानेवारी रोजी प्रदान करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त विविध पुरस्कार देऊन पत्रकारांना सन्मानित करण्यात येत असते. यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२० साली प्रकाशित केलेल्या मूकनायक पाक्षिकास ‘शंभर वर्ष’ पूर्ण होत असल्याने शतकपूर्ती निमित्ताने पत्रकार संघ राज्यभरातील कर्तबगार पत्रकारांचे मूकनायक पुरस्कार देऊन सन्मानीत करीत आहे. तसेच दरवर्षी पत्रकारितेत दीर्घकाळ सेवा करणाऱ्या ऋषितुल्य व्यक्तींना ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करीत असते. यावर्षी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या निवड समितीने संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मूकनायक पुरस्कारासाठी लोकमत जळगाव आवृत्तीचे संपादक मिलिंद कुळकर्णी तर जेष्ठ पत्रकार चंदू नेवे यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार विजय पाठक असणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री गिरीश महाजन, महापौर सौ. भारती सोनवणे, आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा शल्यचिकित्सक नागोराव चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, श्री राजपूत करणी सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविणसिंग पाटील यांची उपस्थिती राहणार असल्याचं पत्रकार संघाने कळविले आहे.

Exit mobile version