Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मिठी नदी १८ किमी लांब, एकाच जागी वस्तू कशा सापडल्या, वाझे यांच्या वकिलाचा कोर्टात युक्तिवाद

 

 

मुंबई: वृत्तसंस्था । मिठी नदी ही  १७ . ८४  किलोमीटर लांब आहे. तिची खोली जवळपास ७०  मीटर  आहे. मग सचिन वाझे यांनी फेकलेल्या वस्तू इतक्या दिवसांनी त्याच जागेवर कशा काय सापडल्या, असा सवाल त्यांचे वकील आबाद पोंडा यांनी विचारला. यातून त्यांनी एकप्रकारे या वस्तू एनआयएनेच प्लांट केल्याचे सूचित केले आहे.

 

 

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या  विशेष न्यायालयात सचिन वाझे आणि एन आय ए च्या वकिलांचा तोडीस तोड युक्तिवाद पाहायला मिळाला. ज्येष्ठ विधिज्ञ आबाद पोंडा हे सचिन वाझे यांची बाजू मांडत आहेत. त्यांनी केलेली मांडणी पाहता सचिन वाझे यांनी अद्याप कोणतीही कबुली दिलेली नाही. त्यामुळे सचिन वाझे पूर्णपणे चेकमेट झाल्याच्या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे, अशी शंका आहे.

 

सचिन वाझे हे गेल्या 23 दिवसांपासून राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात आहेत. त्यांना आणखी काही काळ कोठडीत ठेवणे अन्यायकारक होईल, असे वाझेंच्या वकिलांनी सांगितले. तर एनआयएचे वकील अनिल सिंग यांनी हा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला असून आणखी काही गोष्टींच्या चौकशीसाठी सचिन वाझे यांची कोठडी महत्त्वाची असल्याचे सांगितले. हा सगळा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने सचिन वाझे यांच्या कोठडीत 7 एप्रिलपर्यंत वाढ केली.

 

काही दिवसांपूर्वीच एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सचिन वाझे यांना मिठी नदीच्या परिसरात नेले होते. एनआयएच्या दाव्यानुसार, यावेळी सचिन वाझे यांच्या सांगण्यानुसार मिठी नदीतून वस्तू बाहेर काढण्यात आल्या. यामध्ये सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर, संगणक आणि सीपीयू अशा गोष्टींचा समावेश होता.

 

 

 

राष्ट्रीय तपास यंत्रणेचे वकील अनिल सिंग यांच्या दाव्यानुसार, सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या खात्यातून 26 लाख रुपये काढण्यात आले. आता या खात्यात फक्त 5 हजार रुपये शिल्लक आहेत. तसेच वाझे यांच्या डीसीबी बँकेतील वाझे यांच्या लॉकरमधील कागदपत्रे  हाती लागली आहेत. या कागदपत्रांची चौकशी सुरु असल्याचे अनिल सिंग यांनी सांगितले.

 

मात्र, सचिन वाझे यांच्या वकिलांनी हा आरोप फेटाळून लावला. ज्या खात्यामधून 26 लाख रुपये काढण्यात आले ते संयुक्त खाते आहे. माझ्या अटकेनंतर हे पैसे काढले गेले असतील तर तो एनआयएचा कमकुवतपणा आहे, असेही सचिन वाझे यांनी म्हटले.

 

आतापर्यंत एनआयए सीसीटीव्ही फुटेजच्याआधारे सचिन वाझे यांना कोंडीत पकडू पाहत होती. मात्र, आता वाझे यांनीदेखील सीसीटीव्ही फुटेज सर्व गोष्टी स्पष्ट करेल, असा उलट दावा केला आहे. सीसीटीव्ही फुटेजचा तब्बल 120 टीबी डेटा एनआयएकडे आहे. या फुटेजमध्ये कोणीही छेडछाड करु शकत नाही, अशी टिप्पणीही सचिन वाझे यांनी केल्याचे समजते.

 

सचिन वाझे हे अंबानी स्फोटक प्रकरणात पुरते अडकल्याचे चित्र भाजपच्या नेत्यांकडून रंगवले जात असले तरी प्रत्यक्षात सचिन वाझे यांनी अद्याप कोणत्याही कृत्याची कबुली दिलेली नाही. माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या जिलेटीनचा आरोपही माझ्यावरच लावण्यात आला, असे सचिन वाझे यांनी म्हटले.

Exit mobile version