मालवाहू गाडी भरण्याच्या वादात एकास मारहाण; गुन्हा दाखल

यावल, प्रतिनिधी | मालवाहू गाडीचा नंबर असताना दुसऱ्याने भरून नेण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरून एकाला सहा जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना १६ नोव्हेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

 

याबाबत वृत्त असे की, संतोष सुपडू बारी हा मालवाहू गाडी चालवितो. नेहमी प्रमाणे त्याने  मंगळवार दि. १६ नोव्हेंबर रोजी शहरातील विश्वास ट्रेडर्स समोर मालवाहू गाडीचा नंबर लावला होता. तेथून तो  नाश्ता करण्यासाठी निघून गेला. संतोष बारीचा नंबर असतांना संशयित आरोपी चेतन सुभाष बारी  यांनी त्यांच्या मालवाहु वाहनाने माल भरून नेण्याचा प्रयत्न केला. यावर संतोष सुपडू बारी यांनी चेतन बारी याला याची विचारणा केली. त्याचा राग आल्याने संतोष बारी यास संशयित आरोपी चेतन सुभाष बारी, आकाश सुभाष बारी, सुभाष लक्ष्‍मण बारी, प्रल्हाद लक्ष्मण बारी, संजय लक्ष्‍मण बारी व सचिन प्रल्हाद बारी यांनी शिवीगाळ करून जबर मारहाण केली. यात संतोष सुपडू बारी यांला गंभीर दुखापती झाल्याने उपचाराकामी त्याला जळगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून वरील सहा संशयित आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ असलम खान हे करीत आहेत.

Protected Content