Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मार्च एंडलासुद्धा कार्यालयात शुकशुकाट

 जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – दरवर्षी मार्च अखेर म्हणून शासकीय कार्यालयात देयके, टॅक्स आदी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते परंतु यावर्षी ३१ मार्च रोजी बँकाच नव्हे तर सर्वच शासकीय कार्यालयात शुकशुकाट दिसून आला.
नेहमी मार्च अखेर म्हटला कि शासकीय कार्यालय, बँका, महावितरण, पोस्ट, टेलिफोन निगम, पूर्वीचे जी.एस.टी. आताचे विक्री व सेवा कार्यालय, जिल्हा तसेच तालुका कोषागार, जिल्हाधिकारी, महसूल, नगरपालिका, महापालिका वा अन्य कार्यालयात कर रकमांचा भरणा करण्यासाठी नागरिकांची लांबच लांब रांगा आणि मोठ्या प्रमाणावर गर्दी असे चित्र होते. परंतु या वर्षी  सर्व कार्यालयात शासकीय कर रकमेचा भरणा करणाऱ्यांचा ओघ कमी प्रमाणात दिसून आला असून नागरिकांनी बहुतांश ठिकाणी ऑनलाईन भरणा केल्याचे अधिकारी स्तरावरून सांगण्यात आले. जिल्हा कोषागार कार्यालय तसेच जिल्हा परिषद, नियोजन भवन आदी बहुतांश ठिकाणी कर रकमांचा भरणा ऑनलाईन भरणा झाला असून अधिकारी  व कर्मचारी वर्ग  ऑनलाईन कामे करतांना दिसून आली.
जिल्हा कोषागारात ४४५ देयके सादर
जिल्हा मुख्यालयी कोषागार कार्यालयात मार्च अखेर गर्दी नगण्यच असली तरी ऑनलाईनच्या माध्यमातून १५५ कोटी, ७१ लाख ६९ हजार ६८१ रुपये खर्चाची ४४५ देयके सादर करण्यात आली असल्याचे जिल्हा कोषागार अधिकारी शरद निकुंभ यांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

Exit mobile version