Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माझ्याविरोधात सूडबुद्धीतून कारवाई:– आमदार प्रसाद लाड

मुंबई: : वृत्तसंस्था । मला नोटीस दिली गेलेले प्रकरण २००९ मधील असताना पोलिसांनी आता नोटीस पाठवण्याची गरज काय? इतके दिवस पोलीस झोपले होते काय? असा सवाल करतानाच केवळ सूडबुद्धीतूनच मला नोटीस बजावण्यात आली आहे, असा दावा प्रसाद लाड यांनी केला आहे.

मुंबई महापालिकेत आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस बजावली असून लाड यांनी मात्र आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

प्रसाद लाड यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने मला नोटीस पाठवल्याचं आताच कळलं. ही सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे. २००९ साली ही तक्रार दाखल करण्यात आली होती. बीव्हीजी आणि क्रिस्टलने मिळून हे काम केलं होतं. आमचं काम समाधानकारक होतं म्हणून पालिकेने आमचं डिपॉझिटही परत केलं आहे. याचाच अर्थ यात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. शिवाय हे प्रकरण दहा वर्षांपूर्वीचं आहे. मग त्यावर आत्ताच नोटीस देण्याची गरज काय? इतके दिवस पोलीस झोपले होते का? असा सवाल लाड यांनी केला.

दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत माझं कुठंही नाव नाही. हे सरकार फक्त आमच्या विरोधात कारवाया करत आहे. हा खोटा गुन्हा असून तो रद्द करण्यात यावा यासाठी मी कोर्टात धाव घेणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

हा वाद दोन नेत्यांमधील आहे. २०१३ साली सत्यपाल सिंग यांनी ही केस स्कॉश केली होती. मग ही केस परत का उघडण्यात आली, असा सवाल करतानाच आता मी अब्रुनुकसानीचा दावा करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

इतर लोकांनी पत्रकार परिषदेत जशी उत्तरे दिली तसंही मी करणार नाही. मी माझ्या कामात नेहमीच यशस्वी झालेलो आहे. चौकशीच करायची असेल तर महापालिकेत अनेक घोटाळे झाले आहेत. तिथेही तपास करा. भाजप नेते किरीट सोमय्या आणि खासदार मनोज कोटक कागदपत्रं घेऊन घोटाळे बाहेर काढत आहेत. मग तिथे कारवाई कधी करणार? उद्यापासून मीही पालिका घोटाळ्याच्या फायली द्यायला सुरुवात केली तर?, असा टोलाही त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना लगावला.

Exit mobile version