Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माझ्यापेक्षा शिक्षक जास्त कमावतात — राष्ट्रपती रामनाथ कोविंद

 

 कानपुर : वृत्तसंस्था । “मला पाच लाख रुपये पगार मिळतो याची सगळे चर्चा करतात. पण प्रत्येक महिन्याला त्यातील पावणे तीन लाख रुपये कराच्या स्वरुपात निघून जातात. मग राहिले किती? जेवढे राहिले त्यापेक्षा जास्त तर आमचे अधिकारी वैगेरेंना मिळतात. हे जे शिक्षक बसले आहेत त्यांना तर सर्वात जास्त मिळतात” हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद  यांचे विधान सध्या चर्चेत आहे

.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद शुक्रवारी कानपूरमध्ये दाखल झाले. राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यानंतर रामनाथ कोविंद पहिल्यांदाच आपल्या दीव परौंख येथे ट्रेनने पोहोचले. रामनाथ कोविंद स्थानकावर पोहोचल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. कानपूरमधील झीझक रुरा रेल्वे स्थानकावरही थांबून रामनाथ कोविंद यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी आपल्या पगाराचा उल्लेख करत आपल्यापेक्षा शिक्षक जास्त कमावत असल्याचं म्हटलं.

 

“कधीतरी संतापाच्या भरात, कोणत्यातरी मागणीसाठी ट्रेन थांबवली जाते. कधीतरी ट्रेनमध्ये आगही लावली जाते. पण ही ट्रेन आहे कोणाची? मी फक्त ट्रेनचं उदाहरण देत आहे. अनेकदा आंदोलनात बस, दुचाकींना आग लावली जाते. ही चांगली प्रवृत्ती नाही. यावर आपल्याला त्या क्षणापुरता आनंद मिळू शकतो पण आपल्या पिढीलाच याचा त्रास होणार आहे. ट्रेनचं नुकसान होणं म्हणजे जो कर भरतो त्याचं नुकसान आहे. आपल्याकडे राष्ट्रपतींना सर्वात जास्त पगार आहे, पण ते टॅक्सदेखील देतात,” असं रामनाथ कोविंद यांनी सांगितलं.

 

 

 

“मीदेखील याच मातीमधील असून आपल्यात काही अंतर आहे असं वाटत नाही. प्रोटोकॉलमुळे हे अंतर वाटत असावं पण मनात कोणतंही अंतर नाही. तसंही पाहिलं तर तुम्हीदेखील नागरिक आहात आणि मीदेखील नागरिक आहे. फक्त मला देशाचं पहिलं नागरिक म्हटलं जातं. दोघंही नागरिक असल्याने अंतर असण्याचा प्रश्न नाही,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.

 

पुढे ते म्हणाले की, “स्वातंत्र्यानंतर देशाचा बराच विकास झाला असून अजून बराच होणं बाकी आहे. या विकासाची जबाबदारी फक्त सरकारची नसून आपल्या सर्वांना मिळून करायचा आहे. हा देश आपल्या सर्वांचा आहे. ज्यांना निवडून दिलं आहे फक्त त्या आमदार, खासदारांचा नाही. ते फक्त पाच वर्षांसाठी आले असून पुन्हा संधी दिली तर येतील. पण आपल्या सर्वांना येथेच राहायचं आहे”.

 

Exit mobile version