Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचा पुढील महिन्यात तिसरा टप्पा

 

मुंबई वृत्तसंस्था । कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यभर राबविण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा तिसरा टप्पा डिसेंबर महिन्यात राबविण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत आढावा घेण्यात आला. १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर आणि १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर अशा दोन टप्यांत राबविण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागाने नियुक्त केलेले स्वयंसेवक राज्यातील दोन कोटी ७६ लाख ३३ हजार ९८२ घरांपैकी दोन कोटी ७४ लाख ६३ हजार (९९ टक्के) घरांपर्यंत म्हणजेच ११.९२ कोटी लोकसंख्येपर्यंत पोहोचले. घरोघरी जाऊन ताप आणि प्राणवायू याची तपासणी करण्यात आली. तसेच लोकांना आरोग्य शिक्षण आणि आरोग्यविषयक महत्त्वाचे संदेश देणे, संशयित करोना रुग्ण शोधणे व उपचारासाठी संदर्भ सेवा तसेच मधुमेह, हृदयविकार, मूत्रपिंड विकार, लठ्ठपणा यांसारखे आजार असणार्‍या व्यक्तींचाही शोध घेण्यात आला. या मोहिमेमुळे ५१ हजारापेक्षा जास्त करोना रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या कमी होत असून उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत तब्बल ६३ टक्के घट झाली आहे.

मोहिमेमुळे ३ लाख ५७ हजार आयएलआय व सारीचे रुग्णदेखील आढळले. त्यापैकी तीन लाख २२ हजार ४४६ लोकांची करोना चाचणी करण्यात आली असता ५१ हजार ६४ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्याचप्रमाणे एक लाख १५ हजार करोना रुग्ण घरी उपचार घेत असल्याचे आढळून आले. मधुमेहाचे आठ लाख ६९ हजार, उच्च रक्तदाबाचे १३ लाख आठ हजार, हृदयरोगाचे ७३ हजार, कर्करोगाचे १८ हजार, अशा २३ लाख ७५ हजार रुग्णांचा शोध घेण्यात आला.

दरम्यान, माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेचे दोन्ही टप्पे पूर्ण झाले असून डिसेंबरमध्ये परत एकदा ही मोहीम राबवावी म्हणजे करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मदत होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्यात शुक्रवारी करोनाचे ५,०२७ नवे रुग्ण आढळल्याने आतापर्यंतची एकूण रुग्णसंख्या १७,१०,३१४ पोहोचली. तसेच १६१ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे बळींची संख्या ४४,९६५ झाली. आतापर्यंत १५,६२,३४२ रुग्ण करोनामुक्त झाले.

Exit mobile version