Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माझी हत्या करुन जिंकणार का ?’, कोलकात्यात कट रचला जात असल्याचा ममतांचा आरोप !

 

कोलकाता : वृत्तसंस्था ।  माझी हत्या करुन जिंकणार आहेत काय? आम्ही समाजात शांतता प्रस्थापित केली आहे. पण पैशावर मतं ते घेणार!   मतांमधूनच याचा बदला घ्यावा लागेल, असं सांगत विजयाचा विश्वासही ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला आहे.

 

तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला. बांकुडातील मेजिया इथं आयोजित प्रचारसभेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी अमित शाहांवर जोरदार टीका केली. कोलकाता इथं बसून नोकरशाहीविरोधात कट रचला जात आहे. गृहसचिवांना नोटीस पाठवली जातेय.अनेक उद्योगपतींवर छापेमारी सुरु असल्याचा आरोप ममता यांनी केलाय.

 

पश्चिम बंगालच्या जनतेला माहिती आहे की, ते ममता बॅनर्जी यांना रोखू शकत नाहीत. अशावेळी कोलकाता इथं बसून गृहमंत्री कट रचत आहेत. गृहसचिवांना नोटीस पाठवली जात आहे. निवडणूक काळात त्यांना का परेशान केलं जात आहे? सर्वांना बंद करता येईल, असं अमित शाह यांना वाटतंय का? निवडणूक आयोग कोण चालवतंय? अमित शाह तर चालवत नाहीत ना? असे प्रश्न उपस्थित करत ममता बॅनर्जी यांनी अमित शाहांवर टीकेचा भडीमार केलाय.

 

 

निवडणूक आयोगाच्या कामात हस्तक्षेप सुरु असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. माझ्या सुरक्षा संचालकांना हटवण्यात आलं आहे. आता एवढे मंत्री कोलकाता इथं येऊन बसले आहेत. ते नैसर्गिक आपत्तींवेळी कुठे होते? बाहेरुन आणलेल्या गुंडांकडून निवडणूक होऊ देणार नाही. लूटमार करणाऱ्या भाजपला सरकार चालवू देणार नाही, अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी एकप्रकारे भाजपला आव्हानच दिलं आहे.

 

नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान जखमी झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुन्हा मैदानात उतरल्या आहेत. व्हीलचेअरवर बसून त्यांनी आज प्रचार रॅलीत सहभाग घेतला. इतकच नाही तर जखमी वाघिण जास्त घातक असते, अशा शब्दात विरोधी भाजपला एकप्रकारे आव्हानच दिलं आहे.

Exit mobile version