Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माझा फाटक्या जीन्सला विरोधच — तीरथ सिंह रावत

 

 

डेहराडून ( उत्तराखंड ) : वृत्तसंस्था । “आपला महिलांनी जीन्स वापरण्याला विरोध नाही, पण फाटक्या जीन वापरण्याला विरोधच आहे,” असं उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी म्हटलं आहे.

 

तीरथ सिंह रावत यांचं नाव मागील दोन-तीन दिवसांपासून देशभर गाजत आहे. फाटकी जीन्स घालून फिरणारी महिला कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल, असं विधान रावत यांनी केलं होतं. त्यावरून त्यांच्यावर सर्वच स्तरांतून टीका झाली. टीकेचे धनी ठरल्यानंतरही रावत यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे.

 

तीरथ सिंह रावत यांनी बाल हक्क संरक्षण आयोगाच्या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना वक्तव्य केलं होतं. ज्याचे देशभरात पडसाद उमटले. सर्वच स्तरातून टीका होत असताना रावत यांना त्यांच्या विधानाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपला महिलांनी फाटक्या जीन्स वापरण्याला विरोध कायम असल्याचं म्हटलं. “माझा महिलांनी जीन्स वापरण्याला विरोध नाही. पण, फाटक्या जीन्स वापरण्याला माझा विरोधच आहे,” असं रावत यांनी म्हटलं आहे.

 

 

“एकदा मी विमानातून प्रवास करत होतो. त्यावेळी मी बघितलं की, एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन जवळच बसलेली होती. त्या महिलेनं फाटलेली जीन्स घातलेली होती. मी त्या महिलेला विचारलं की कुठे जायचं? यावर ती महिला म्हणाली दिल्लीला. त्या महिलेचा पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे आणि ती महिला स्वयंसेवी संस्था चालवते. माझ्या मनात विचार आला, जी महिला एनजीओ चालवते आणि फाटलेली जीन्स घालून फिरते. लोकांना भेटते. अशी महिला समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करते. जेव्हा आम्ही शाळेत होतो, तेव्हा असं नव्हतं,” असंही रावत म्हणाले. तरुणांमध्येही व्यसन वाढत चाललं आहे. नशेबरोबरच आपल्याला सर्व विकृतींपासून मुलांना दूर ठेवून संस्कारी बनवावं लागेल. तसेच पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावापासून दूर राहावं लागेल,” असं विधान रावत यांनी केलं होतं.

Exit mobile version