Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महुआ मोईत्रा यांचे भाजपला तडाखेबाज प्रत्युत्तर

 

कोलकाता : वृत्तसंस्था । ३० मिनिटे उशीराच्या कथित विलंबावरून इतका गोंधळ? भारतीय सात वर्षांपासून १५ लाखाची वाट बघताहेत. लोक एटीएमबाहेर तासन् तास आहेत. लशीसाठी वाट बघत आहेत. कधी कधी थोडी प्रतीक्षा तुम्हीही करा,” असं म्हणत महुआ मोईत्रा यांनी केंद्र सरकार आणि भाजपाला प्रत्युत्तर दिलं.

 

बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या यास चक्रीवादळाने ओडिशा आणि पश्चिम बंगाल तडाखा दिला. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी हवाई पाहणी केली. मात्र, त्यानंतर झालेल्या आढावा बैठकीवरून बंगालमध्ये नव्या राजकीय वादाची ठिणगी पडली. मोदी यांच्या आढावा बैठकीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अर्धा तास उशिराने पोहोचल्या. त्यामुळे पंतप्रधानांना वाट बघावी लागली. त्यानंतर ममतांना झालेल्या विलंबावरून भाजपा नेत्यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली. भाजपाकडून ममतांवर टीका झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिलं.

 

पंतप्रधानांनी हवाई पाहणीनंतर आढावा बैठक घेतली. या बैठकीला ममता बॅनर्जी ३० मिनिटं उशिराने पोहोचल्या. ममता बॅनर्जी यांच्या वर्तणुकीवर केंद्र सरकारकडून टीका करण्यात आली. त्याबरोबर ममता बॅनर्जी यांनी मुद्दाम उशीर केल्याचा दावा करत भाजपाच्या नेत्यांनी निशाणा साधला. भाजपाकडून होत असलेल्या टीकेला तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी उत्तर देत पलटवार केला.

 

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला सत्तेत येऊन तीन आठवडे उलटत नाही, तोच राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे. काही दिवसांपूर्वीच तृणमूल काँग्रेसचे मंत्री आणि आमदारांना सीबीआयने अटक केल्यावरून ममतांनी केंद्रावर आगपाखड केली होती.

 

चक्रीवादळाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या आढावा बैठकीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व राज्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी अनुपस्थित राहणे हे कृत्य उद्धटपणाचे आणि अविचारी असून मुख्यमंत्र्यांची वर्तणूक हा शिष्टाचार आणि संघराज्यवादावरील आघात आहे,” असं केंद्र सरकारने ममतांनी केलेल्या विलंबावरून म्हटलं होतं. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही ममतांवर निशाणा साधला होता.

Exit mobile version