Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिलेला वाचविणार्‍या पोलीसाचा ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार

 मुंबई / जळगाव : प्रतिनिधी । दादर रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नातील महिलेचा प्राणाची पर्वा न करता जीव वाचवणारे मूळचे अमळनेरकर पोलीस कर्मचारी विजय चव्हाण यांच्या शौर्याला सलाम करीत आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांचा हृद्य सत्कार केला.

 

गेल्या आठवड्यात रात्री साडेनऊच्या सुमारास हावडा एक्सप्रेसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात असणार्‍या महिलेचा पाय अचानक घसरला. ती महिला  ट्रेनच्या पायर्‍या आणि फलाट यांच्यातील मोकळ्या जागेत पडली. काही क्षणात ट्रेनच्या चाकात येऊन मरण्याची शक्यता होती. याप्रसंगी त्या प्लॅटर्फार्मवर असणारे दादर पोलीस स्थानकातील कर्मचारी विजय रमेश चव्हाण यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्या महिलेला बाहेर खेचले. यामुळे त्या महिलेचे प्राण वाचले. विजय चव्हाण यांचे हे शौर्य कौतुकाचा विषय बनले असून सोशल मीडियात त्यांच्या या बचाव कृत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

 

विजय चव्हाण हे मूळचे अमळनेर येथील रहिवासी असून ते दादर पोलीस स्थानकात कामाला आहेत. आपल्या जिल्ह्यातील पोलीस कर्मचार्‍याच्या या शौर्याची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना मिळताच त्यांनी आज मंत्रालयात विजय चव्हाण यांचा हृद्य सत्कार केला. पोलीस हा कायद्याचा रखवालदार तर आहेच पण तो संवेदनशील देखील असतो. यामुळे आपले प्राण धोक्यात घालून विजय चव्हाण यांनी खाकीचा गौरव खर्‍या अर्थाने वाढविला असल्याचे कौतुकोदगार गुलाबराव पाटील यांनी काढले.

 

सत्कारा प्रसंगी फौजदार रवींद्र धुळे , सहाय्यक फौजदार राजेंद्र गुरव , खाजगी सचिव अशोक पाटील,  ओ.एस. डी. बडे  , स्विय सहाय्यक गोविंद पाटील , पालव , प्रवीण पाटील यांच्यासह अधिकारी,  कर्मचारी उपस्थित होते.

 

Exit mobile version