Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिला व बालविकास विभागाच्यावतीने साजरा करण्यात येणार ‘सावित्री उत्सव’ !

 

मुंबई, वृत्तसंस्था  । महिला शिक्षणाच्या प्रणेत्या, आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याच्या गौरवार्थ आणि भावी पिढीला त्यातून प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचा जन्मदिवस महिला व बालविकास विभागाच्यावतीने ‘सावित्री उत्सव’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.

ॲड. ठाकूर पुढे म्हणाल्या की, ‘उत्सव सावित्रीचा, जागर स्त्री शक्तीचा’ ही मध्यवर्ती संकल्पना ठरवून त्यानुसार प्रत्येक अंगणवाडी, मिनी अंगणवाडी स्तरावर अर्थात गावांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्त्री शिक्षणाच्या जनजागृतीसाठी ‘सावित्री दिंडी’चे आयोजन, अंगणवाडी, गावातील लहान मुलींना सावित्रीबाईंचा पेहराव करुन स्त्री शिक्षणाचे आवाहन करण्यात येणार आहे. महिलांना कार्यक्रमात समाविष्ट करून त्यांच्याकडून सावित्रीबाईंच्या जीवनकथेचे वाचन करवून घेतले जाईल. त्याशिवाय कोरोना कालावधीत उत्कृष्ट सेवा बजावलेल्या कोविड योद्ध्या सेविका, मदतनीसांचा सत्कार करण्यात येणार आहे.

अभिनव पद्धतीने नवजात मुलीच्या जन्माचे स्वागत, महिला सक्षमीकरणासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला बचत गटांचा सन्मान, सावित्रीबाईंच्या कार्याची माहिती देण्यासाठी त्यांच्या कार्यावर आधारित नाटक, गीतांचे आयोजन, तसेच पोषण आहाराविषयी प्रबोधन आदी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असेही त्या म्हणाल्या.

Exit mobile version