Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिला टि-२० विश्‍वचषकात भारताची विजयी सलामी

mahila t 20

सिडनी वृत्तसंस्था । ऑस्ट्रेलियात आजपासून सुरू झालेल्या महिलांच्या टि-२० विश्‍वचषकात भारतीय चमूने यजमानांना १७ धावांनी पराभूत करून स्पर्धेची सुरूवात झोकात केली आहे.

ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताकडून फलंदाजीसाठी उतरलेली स्मृती मानधना लवकर तंबूत परतली. तर पहिला टी २० विश्‍वचषक सामना खेळणारी शफाली वर्माही १५ चेंडूत २९ धावा करून बाद झाली. भारताची अनुभवी कर्णधार हरमनप्रीत कौर पाठोपाठ मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात यष्टीचीत झाली. यानंतर मुंबईकर रॉड्रीग्जने दिप्ती शर्मासोबत सावध खेळ केला. त्या दोघींनी डावाला आकार दिला. पण फटकेबाजीच्या प्रयत्नात अखेर रॉड्रीग्ज माघारी परतली. तिने ३३ चेंडूत २६ धावा केल्या. दिप्ती शर्माने मात्र शेवटपर्यंत झुंज दिली आणि नाबाद ४९ धावा केल्या. या दोघींच्या भागीदारीच्या जोरावर भारताने २० षटकात ४ बाद १३२ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला १३३ धावांचे आव्हान दिले.

आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर हेली हिने अर्धशतकी केली, पण पूनम यादवच्या फिरकीपुढे यजमान ऑस्ट्रेलियाचा संघ ढेपाळला. अनुभवी फिरकीपटू पूनम यादव हिने चार बळी घेऊन यजमानांचे कंबरडे मोडून आपल्या संघाचा विजय साकार केला.

Exit mobile version