Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये राज्यात मोठी घट

 

नागपूर : वृत्तसंस्था ।  महाराष्ट्रात २०१९च्या तुलनेत २०२० मध्ये काही निवडक गुन्हे वगळता महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट नोंदवण्यात आली आहे.

 

कोरोना टाळेबंदीच्या काळात कौटुंबिक कलहांमध्ये वाढ झाल्याची ओरड होत होती. पण कौटुंबिक कलहाच्या गुन्ह्यांमध्ये निम्म्याहून अधिक घट झाली आहे.

 

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) प्राप्त माहितीच्या आधारे २०१९ आणि २०२०च्या महिलांविरोधी गुन्ह्यांचा अभ्यास केल्यास २०२० मध्ये महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे स्पष्ट होते.

 

२०१९ मध्ये महिलांविरुद्ध वेगवेगळ्या प्रकारच्या ३७ हजार ११२ गुन्ह्यांची राज्यात नोंद झाली होती, पण २०२० मध्ये ही संख्या घटून ३१ हजार ९५४ इतकी झाली. बलात्कार करून खून करण्याच्या २०१९ मध्ये १५ घटना घडल्या होत्या. २०२० मध्ये त्यात पाचने वाढ झाली असून एकूण २० गुन्ह्यांची राज्यात नोंद आहे. हुंडाबळीच्या २०१९ मधील १९६ घटनांमध्ये २०२० मध्ये एकने वाढ झाली असून १९७ गुन्हे दाखल झाले. महिलांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या २०१९ मध्ये ८०२ घटना होत्या. २०२० मध्ये ८३२ गुन्ह्यांची नोंद आहे. बळजबरी गर्भपाताच्या गुन्ह्यांमध्येही वाढ असून २०२० मध्ये १८ गुन्हे आहेत, तर २०१९ मध्ये असे आठ गुन्हे घडले होते. त्यानंतर अॅ सिड हल्ला, अॅनसिड हल्ल्याचा प्रयत्न, पती व पतीच्या कुटुंबीयांकडून क्रूरता, महिलांचे अपहरण, महिलांची विक्री, लहान मुलींची विक्री, लहान मुलींची खरेदी, बलात्कार, बलात्काराचा प्रयत्न आणि विनयभंग या घटनांमध्ये कमालीची घट नोंदवण्यात आली आहे.

 

Exit mobile version