Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिलांच्या सुरक्षेवर जास्तीत जास्त बोलायला हवे ; ना. आदित्य ठाकरे

मुंबई, वृत्तसेवा । देश स्वतंत्र असून कोणतीही महिला कितीही वाजता बाहेर गेली, काहीही कपडे घातले, एकटी असेल किंवा मित्रांसोबत असेल… तिला हात लावायचा, डोळे मारायचा अधिकार नाही म्हणजे नाही, असा परखड शब्दात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. ते महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत महिला सुरक्षेवर चर्चा झाली त्यात ते विचार प्रकट करत होते.

महिलांच्या सुरक्षेवर महिलांपेक्षा पुरुषांनी जास्तीत जास्त बोलायला हवे, असे नमूद करत आदित्य ठाकरे यांनी महिला सुरक्षा ते महिला सबलीकरण अशा विविध मुद्द्यांना स्पर्श केला. महिला सबलीकरण हा महत्त्वाचा मुद्दा असून यावर विधीमंडळात किमान दर तीन महिन्यांनी चर्चा व्हायला हवी. त्यातही महिलांपेक्षा पुरुषांना जास्त बोलण्याची संधी दिली पाहिजे. महिला महिलेबद्दल काळजीनेच बोलणार मात्र पुरुष त्यावर कसे बोलतात, हे ऐकण्यासारखे असेल, असे ते म्हणाले. आयुष्यातील महत्त्वाच्या प्रत्येक पायरीवर कोणत्या ना कोणत्या रूपाने महिलांचेच संस्कार आपल्यावर घडत असतात. त्यानंतरही असे नक्की कोणते पुरुष आहेत जे महिलांकडे वाकड्या नजरेने पाहतात ते हुडकायला हवे. हा मोठा विषय असून याकडे गांभीर्याने पाहायला हवे, असे सांगितले. महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी कठोर कायदा व्हायला हवा, असे आपण सगळेच बोलत आहेत. पण प्रत्यक्षात शिक्षेवर बोलतानाच महिलांवर कोणत्याही प्रकारचा अत्याचारच होणार नाही, यावरही बोलण्याची, सखोल विचार करण्याची गरज ठाकरे यांनी नमूद केली. शालेय अभ्यासक्रमात अगदी चौथीपासून ‘राइट टच’, ‘राँग टच’ काय असते हे शिकवायला हवे. शाळेपासूनच स्त्री-पुरुष समानतेचे धडे देणे आवश्यक आहे. महिलांना व्यापक प्रमाणात स्वसंरक्षणाचे धडेही दिले गेले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. . महिलेवर कुठे अत्याचार होत असेल तर महिलेने कालीमातेचे रूप धारण करायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, ठाकरे यांनी ‘हातात बांगड्या भरल्या नाहीत’ या विधानावरून पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. मला येथे टीका करायची नाही पण मी हातात बांगड्या घातलेल्या नाहीत, मी साडी नेसत नाही, मी तुला बाई वाटलो का, अशी विधाने आपण सहज करून जातो. हे थांबायला हवे. महिलांना कोणत्याही बाबतीत कमी लेखले जाऊ नये, ही माझी विनंती आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.

Exit mobile version