Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिलांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी ; ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ जिल्हा कृती दलाच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

जळगाव (प्रतिनिधी) महिलांच्या छळवणूकीच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्याबरोबरच त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यास संबंधित यंत्रणांनी प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानातंर्गत स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा कृति दलाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते.

 

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, उपजिल्हाधिकारी (महसुल) रविंद्र भारदे, उपविभागीय पोलीस अधिकारी (मुख्यालय) दिलीप पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) श्री. तडवी, तहसीलदार वैशाली हिंगे यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जिल्ह्यात मुलींची संख्या वाढण्यासाठी प्रशासनातर्फे जनजागृती करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखाव्यात. त्याचबरोबर जिल्ह्यातील सोनोग्राफी सेंटरची तपासणी करावी. शिवाय आदिवासी भागातील 12 ते 14 वयोगटातील किशोरवयीन मुलींची आरोग्य यंत्रणेमार्फत तपासणी करुन त्यांच्यातील हिमोग्लोबीन तपासावे. महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी पोलीस विभागाने दक्षता घ्यावी. महिलांची छळवणूक होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास अशा तक्रारींवर तत्काळ कारवाई करावी. वन स्टॉप सेंटरमार्फत महिलांचे समुपदेशन करावे. यासाठी या सेंटरमध्ये एक महिला पोलीस उपनिरिक्षकांची नेमणूक करावी आदि सुचनांही जिल्हाधिकारी यांनी यावेळी संबंधितांना दिल्यात. तसेच महिलांच्या अडचण सोडविण्यासाठी त्यांनी 181 या क्रमांकांवर संपर्क साधावा. सध्या देशात मुलींचा जन्मदर दर हजारी 927 इतका तर राज्याचा दर 894 इतका आहे. तर जळगाव जिल्ह्यात मुलींचे गुणोत्तर 922 इतके आहे. हे प्रमाण अजून वाढण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. परदेशी यांनी सांगितले.

Exit mobile version