Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महासभेत विरोधकांनी प्रशासनावर ओढले ताशेरे (व्हिडिओ)

जळगाव, जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महापालिकेच्या आव्हाणे शिवारातील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचे सुधारित वाढीव संविदा रकमेनुसार काम करण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावास भाजपच्या सदस्यांनी विरोध करत नवीन स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविण्याची मागणी केली. हा विषय बहुमताने मंजूर करण्यात आला. तर महापालिका हद्दीतील खासगी तसेच मनपा जागेत लावण्यात येणाऱ्या आकाश चिन्हे, जाहिरात, बॅनर, फलकासाठी असलेल्या शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव तहकूब ठेवण्यात आला.

 

महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन महासभेचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते.
घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या अटी-शर्तीत बदल न करत वाढीव कामाची सरळ नवीन निविदा प्रक्रिया राबवावी अशी मागणी करत आपण घरकुल प्रमाणे नवीन घोटाळ्याकडे जात असल्याचा आरोप भाजप नगरसेविका अॅड.शुचिता हाडा यांनी महासभेत केला. तर वाढीव दर आले तर त्याची जबाबदारी कोण घेईल? असा प्रश्न शिवसेनेचे नितीन लढ्ढा यांनी उपस्थित केला. यावर अॅड. हाडा यांनी संताप व्यक्त करत नियमबाह्य कामांना मंजुरी द्यायची का ? नियमबाह्य ठराव करून जेलची वारी करण्यास भाग पाडू नका असे निक्षून सांगितले. यावेळी भाजपा बंडखोर सुनील खडके हे देखील तटस्थ राहिल्याने बहुमताने ठराव मंजूर करण्यात आला. मात्र, पुढील ठरावाचे वाचन सुरु झाल्यावर अॅड. हाडा व भाजपा सदस्यांनी याविषयावर मतदान घेऊन बहुमत सिद्ध करावे असे आग्रह धरला असता एकच गोंधळ उडाला. प्रशासनाने चुकीचा डीपीआर कसा दिला याची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. गोंधळातच पुढील ठराव मंजूर करण्यात आले. आज २१ ठराव महासभेत ठेवण्यात आले होते. यापैकी महापालिका हद्दीतील खासगी तसेच मनपा जागेत लावण्यात येणाऱ्या आकाश चिन्हे, जाहिरात, बॅनर, फलकासाठी असलेल्या शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव तहकूब तर घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या वाढीव कामांसाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविण्यात येत नसल्याने बहुमताने मंजूर करण्यात आला.

दरम्यान, महापौर जयश्री महाजन यांनी आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडतांना सांगितले की, घनकचरा प्रकल्प लवकरात लवकर कार्यन्वित होऊन नागरिकांना कचऱ्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या कमी होण्यास मदत मिळणार आहे. तसेच आजच्या महासभेत १० कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निधीतून १० कोटींच्या संविदाना मंजुरी मिळाली असून लवकरच ही कामे सुरु होणार आहेत.

 

 

Exit mobile version