Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी २३ मे पर्यंत परीक्षा अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरावे

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या ज्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन तथा विद्यापीठ परीक्षांचे अर्ज सादर केलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज ऑनलाईन पद्धतीने महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून २३ मे पर्यंत भरून घेणे आवश्यक असल्याचे परीक्षा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे व त्यानंतरच्या टाळेबंदीमुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेऊन विद्यापीठाच्या परीक्षा घेण्याबाबत व सर्व विद्यापीठांचे शैक्षणिक कॅलेंडर तयार करण्यासाठी राज्य शासनाने समिती गठीत केली होती. समितीने युजीसीने निर्गमित केलेली मार्गदर्शक तत्वे आणि विविध कुलगुरू व भागधारकांनी केलेल्या सुचनांच्या अनुषंगाने काही शिफारशी केल्या आहेत. विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्यासंदर्भात अहवालात दहाव्या क्रमांकावर शिफारस केली आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन तथा विद्यापीठ परीक्षांचे अर्ज सादर केले नाहीत अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरले जावेत तसेच त्यांची माहिती व अर्जात सर्व माहितीची खातरजमा त्या त्या महाविद्यालयांचे प्राचार्य/परिसंस्थांचे संचालक व विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रशाळा विभागांचे संचालक/विभागप्रमुख यांनी विहित कालावधीत करून घ्यावी असे या शिफारशीत म्हटले आहे. त्यानुसार परीक्षा अर्ज व त्यासोबतचे दस्तऐवज ज्या विद्यार्थ्यांचे अद्यापपावेतो विद्यापीठात सादर केलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज महाविद्यालयाने संबंधित विद्यार्थ्यांकडून ई-मेल द्वारे किंवा इतर ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क व विलंब शुल्क न आकारता २३ मे पर्यंत मागविण्यात यावेत. याकरिता महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ई-मेल व संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात यावा असे परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक बी.पी. पाटील यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

महाविद्यालयासाठी आवाहन
ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज डीयू पोर्टलवर तयार आहेत अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज ऑनलाईन पद्धतीने महाविद्यालयाच्या लॉगिन द्वारे इनवर्ड करण्यात यावेत. यासाठी इनवर्ड लिंक १३ ते २३ मे पर्यंत उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच जे परीक्षा अर्ज ऑनलाईन इनवर्ड होणार नाहीत अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज सर्व दस्तऐवजासह स्कॅन करून sfc@nmuj.digitaluniversity.ac या ई-मेल वर २६ मे पर्यंत पाठवावेत असे आवाहन महाविद्यालयाला देण्यात आले आहे.

Exit mobile version