Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाविकास आघाडी सरकार कार्यकाळ पूर्ण करणार — शरद पवार

 

पुणे : वृत्तसंस्था  । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष टीकेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

 

या सरकारमध्ये योग्य समनव्य असून अत्यंत व्यवस्थित चाललं असल्याचं सांगत त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी सरकारमधील तिन्ही पक्षांमधील समन्वयाची जबाबदारी सहा नेत्यांवर असल्याचं सांगितलं आहे. ते बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

“सरकार चालवताना कधीतरी काही प्रश्न निर्माण होतात. असे प्रश्न येतात तेव्हा त्यातून मार्ग काढण्यासाठी एखादी यंत्रणा असावी अशी चर्चा झाली आणि त्यानुसार तिन्ही पक्षांच्या वतीने काही सहकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपवली. यामध्ये काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आहेत. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई व राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि जयंत पाटील त्यामध्ये आहेत,” असं शरद पवारांनी सांगितलं आहे.

 

“कोणत्याही महत्वाच्या धोरणात्मक प्रश्नासाठी हे आमचे सहा सहकारी एकत्र बसतात आणि त्यासंबंधी निर्णय घेतात. त्यामुळे सरकार अत्यंत व्यवस्थित चाललं आहे. आणि याच पद्धतीने जाण्याची भूमिका सर्वांची असल्याने सरकार पाच वर्ष टीकेल याबाबत शंका नाही,” असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे.

 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) नागरी सहकारी बँकांचे व्यवस्थापकीय संचालक तसेच पूर्ण वेळ संचालक होण्यास आमदार, खासदारांना प्रतिबंध घातला आहे. आरबीआयने यासंबंधी अधिसूचना काढली आहे. यामुळे राजकारणी, नेत्यांची वर्णी लावून स्वकीयांच्या कर्ज वाटपाद्वारे मूळ गुंतवणूकदार, ठेवीदारांच्या रकमेवर डल्ला मारणाऱ्या नागरी सहकारी बँकांना आता चाप बसणार आहे. आरबीआयच्या या निर्णयावरही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

“आरबीआय ही आर्थिक संस्था, बँकिंग संस्था यांच्यावर लक्ष ठेणारी सर्वोच्च संस्था आहे. त्यामुळे त्यांनी काही धोरणात्मक निर्णय घेतले असतील तर त्याची माहिती घ्यावी लागले. निर्णय घेतला असेल तर तो स्वीकारावा लागेल,” असं शरद पवार म्हणाले आहेत.

 

Exit mobile version