Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाविकास आघाडीतील श्रेयवाद, टोकाच्या मतभेदांमुळे विकास रखडला – आ. गिरीश महाजन (व्हिडीओ)

जळगाव : वृत्तसंस्था । महाविकास आघाडीतील श्रेयवाद व टोकाच्या मतभेदांमुळे राज्यात विकास रखडला आहे असा आरोप आज माजी मंत्री व आ. गिरीश महाजन यांनी केला.

भाजप कार्यालय वसंतस्मृती येथे झालेल्या पत्रपरिषदेत बोलताना आ . गिरीश महाजन यांनी यंदाच्या पीक परिस्थितीबद्दलही चिंता व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, आपल्या भागात धरणे, तलावांमध्ये आता पाणी नाही. सव्वा दोन महिन्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही जमिनीत दीड – दोन फूटसुद्धा ओल नाही पुढे आता कधी आणि किती पाऊस पडेल ? पाणी पातळी कधी आणि किती वाढेल ? याचा कुणालाच काहीच अंदाज नाही हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. पुढच्या संकटाची चाहूल लागली आहे. दुसरीकडे कोल्हापूर, रायगड, सातारा, सांगली भागात पावसाने होत्याचे नव्हते करून टाकले. पावसाच्या तेथील थैमानाला वर्णन करायला शब्द नाहीत आम्ही महाड, तळिये येथेही गेलो होतो वारंवार त्या संकटात तेथील जिल्हाधिकाऱ्यांशी बोलत होतो पण काही माहिती मिळत नव्हती कारण त्यांच्याकडेच काही माहिती नव्हती . आम्ही आधी तेथे पोहचलो तोपर्यंत काहीच शासकीय यंत्रणा तेथे  आलेली नव्हती ३२ मृतदेह ग्रामस्थांनीच ढिगाऱ्यातून बाहेर काढलेले होते , यापेक्षा राज्याचे दुर्दैव कोणते ? , त्यानंतर ४ तासांनी पालकमंत्री व अधिकारी आले असे हे निर्ढावलेले सरकार आहे लोकांचा क्षोभ वाढल्यावर मंत्री त्या भागात गेले राज्यभरातून भाजपने त्या भागात मदत आणि जीवनावश्यक वस्तू पाठवल्या असेही ते म्हणाले

अन्य एका मुद्द्यावर आ. गिरीश महाजन यांनी सांगितलं की, शासनाकडे पैसाच नाहीय त्यामुळे आपल्या जिल्ह्याला काय मिळणार ? २ वर्षात जलसंपदा खात्याला एक दमडीही मिळालेली नाही समाजातील सर्व घटक हवालदिल झालेले आहेत . हे सरकार आपल्याच हाताने स्वतःची पाठ थोपटून घेत आहे आमच्या सरकारच्या काळात पूर्ण झालेल्या कामांची उदघाटने करून श्रेय घेतले जाते आहे फक्त टी व्ही वर बडबड करून भूलथापा मारायच्या हेच काम राज्यात सुरु आहे.

जळगावातील परिस्थितीबद्दल बोलताना ते म्हणाले की, भाजपमधून फुटलेले जळगावातील नगरसेवक आता पश्चाताप करीत आहेत ते भूलथापांना बळी पडले मात्र आता त्यांची भावना आपण खड्ड्यात पडल्याची झाली आहे.

दररोज  सकाळी केंद्र सरकारवर खापर फोडायचे काम या सरकारकडून केले जाते असे असेल तर तुमची काहीच जबाबदारी नाही का ? हा माझा त्यांना प्रश्न आहे , असे सांगत आ . गिरीश महाजन पुढे म्हणाले की , अपयश लपवण्यासाठी या सरकारकडून कपोलकल्पित गोष्टी माध्यमांसमोर मांडल्या जात आहेत मुमबीतील लोकलच्या प्रश्नावरपण राज्य सरकार पुढाकार घेत नाहीय बसमध्ये झालेली गर्दी चालते , मग लोकलमधील गर्दीनेच त्रास वाढणार आहे का ? दुसरीकडे नियमाचे पालन करून मंदिरे उघडायला काय हरकत आहे ? मात्र यांना धोरणच ठरवत येत नाही कारण या सरकारमधील मंत्र्यांना उद्या काय होईल याची शाश्वती नसल्याने अनागोंदी सुरु आहे महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळ्याच गोष्टींवरून टोकाचे मतभेद आहेत श्रेयवाद आहेत त्यामुळे विकास खुंटलेला असला तरी त्यांना विकास आणि सामान्य माणसाची चिंता नाही , असेही ते म्हणाले .

फैजपूर दौऱ्यात महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांना आठवडाभरापूर्वी  कुपोषणामुळे दगावलेल्या बालकाच्या कुटुंबाला भेटून त्यांना धीर द्यावा वाटलं नाही यावरून त्यांची संवेदनाशून्यता दिसते त्यांचा दौरा म्हणजे पिकनिक  सारखा होता का ? असे म्हणत   या पत्रपरिषदेच्या प्रारंभीच आमदार राजूमामा भोळे यांनी यशोमती ठाकूर यांचा निषेध केला.

जिल्ह्यातील  रस्ते वाहतूक, औद्योगिक, रेल्वे, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अर्थ या संदर्भातील मागण्यांसाठी संबंधित केंद्रीय मंत्र्यांची दिल्लीत जाऊन आमदार गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार भाजपच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली. या शिष्टमंडळात आमदार राजूमामा भोळे, जि.प उपाध्यक्ष लालचंद पाटील, जि.प. सदस्य नंदू महाजन, रावेरचे प्रल्हाद पाटील, दीपक साखरे आदींचा समावेश होता अशी माहिती या पत्रपरिषदेत देण्यात आली.

जळगावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या नशिराबाद नाका ते बांभोरी नाकापर्यंतच्या वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या विकासासाठी निधीची मागणी करणारे निवेदन नितीन गडकरी यांना देण्यात आले . शिवाजीनगर , पिंप्राळा , आसोदा  रेल्वे गेट येथील उड्डाणपुलाचे काम लवकर सुरु करण्याचे आदेश संबंधितांना देण्याबद्दलचे आणि भोईटेनगर  येथील मालधक्का अन्यत्र हलवण्याबाबत निवेदन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना देण्यात आले केळीच्या वाहतुकीसाठी जळगाव ते दिल्ली रॅक मंजूर केल्याचे यावेळी राज्यमंत्री दानवे यांनी सांगितले आपला जिल्हा भुसावळ रेल्वे स्थानक , विमानतळ , मुंबई – नागपूर आणि सुरत इंदूर महामार्गाच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने याचा आणि प्रमुख पिकांचा विचार करून जिल्ह्यात शेतीवर आधारित लघु व मध्यम  उद्योग वाढावे यासाठी अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनाही निवेदन देण्यात आले जिल्ह्यातील  लघु व मध्यम उद्योगांच्या विकासाबद्दल केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनाही निवेदन देण्यात आले . केळीवर प्रक्रिया करून निर्यात करण्यासाठी केंद्रीय कृषी खात्याकडून सुविधा आणि सबसिडी मिळावी यासाठी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले अशा  सबसिडीसाठी राज्याचा वाट ४० टक्के आणि केंद्राचा वाट ६० टक्के असा असेल असा प्रस्ताव राज्य सरकारकडे  प्रयत्न करून आणावा पुढे योजनेला आम्ही मंजुरी देऊ असे केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी सांगितले पंचायत राज विभागाचे राज्यमंत्री कपिल पाटील यांना बचत गटांच्या योजना आणि ग्रामपंचायतींचे अनुदान वाढविण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले त्यांना नागरी सत्कारासाठी जळगावला येण्याचे दिलेले निमंत्रण त्यांनी स्वीकारले आहे आरोग्य राज्यमंत्री भारती पवार  यांनीही जळगावात आढावा बैठक घेऊन जिल्ह्याला जास्तीत जास्त मदत आरोग्याच्या योजनांसाठी देण्याचे आश्वासन या शिष्टमंडळाला दिले असल्याचे या पत्रपरिषदेत सांगण्यात आले .

Exit mobile version