Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात जळगावच्या कलावंतांच्या चित्रांची निवड

जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या कला संचानालयाच्या 60 व्या महाराष्ट्र राज्य वार्षिक कला प्रदर्शनात यावर्षी जळगावच्या कलावंतांच्या चित्रांची निवड झाली. विकास मल्हारा, विजय जैन, जितेंद्र चौधरी यांच्या चित्रांचा त्यात समावेश आहे. जळगावकरांसाठी ही बाब अभिमानास्पद आहे.

दरवर्षीप्रमाणे राज्यभरातून आलेल्या कलाकृतीतून नामांकित परिक्षकांकडून या चित्रांची निवड केली जाते. निवडक चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरी येथे 7 जानेवारी 2020 सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे. 7 ते 13 जानेवारी दरम्यान प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

विकास मल्हारा हे जैन इरिगेशनच्या कला विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत. बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडीया, एकल व ग्रृप शो सह देशातल्या अनेक गॅलरीजमधून त्यांचे शो झाले आहेत. यंदा होणाऱ्या टागोर आंतरराष्ट्रीय कला महोत्सवात त्यांच्या चित्रांची निवड झाली आहे. अमूर्त चित्रकार मोनड्रीयनला जीवनातील सर्व घटक सरळ किंवा आडवी रेषातच दिसत होती. हा त्यांचा शोध होता. कॅनव्हास एक अवकाशच असून त्याच्या अवतीभवतीच्या संवेदना ज्या अमूर्त आहे त्या कशा रंगविता येतील हीच मनाची धडपड आहे असे विकास मल्हारा म्हणतात.

पोत आणि रंगलेखनाच्या साहाय्याने निसर्ग आणि मानवी संवेदनांना संयुक्तपणे साकारत एका पातळीवर वेगळ्या भावविश्वात घेऊन जाणारी अमूर्त चित्र शैली असल्याचे विजय जैन म्हणतात. जैन इरिगेशनमधील कला विभागात विजय जैन हे चित्रकार आहेत. लोणावळा, ठाणे, चौल, काठी, नशिराबाद तसेच देवास येथील विविध कला शिबीरांमधून त्यांच्या कलेला रसिकांची भरभरून दाद मिळाली आहे. जळगाव, मुंबई, भोपाळ, उज्जैन, बडोदा येथे गृप व एकल प्रदर्शनी, यावर्षी ललित कला अकादमी दिल्लीच्या 60 व्या वार्षिक प्रदर्शनात त्यांच्या चित्रांची निवड झाली आहे.

एटीडी-डीपीएड असलेले एनीमेशन इन्स्टीट्युट चालवणारे चित्रकार जितेंद्र चौधरी यांची चित्रे बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया व ललित कला अकादमी, व्ही ओक पुणे अशा नामांकीत प्रदर्शनासह इतर अनेक प्रदर्शनात प्रदर्शित झाली आहेत. यावर्षी प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये त्यांचे ग्रृप प्रदर्शन आयोजित केले होते. ग्राफीक फॉर्मच्या कॅनवासवर लिलया साकार होणाऱ्या त्यांच्या विशेष शैलीतील चित्रांना रसिकांची सुखावह दाद मिळत असते.

Exit mobile version