Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराष्ट्र भाजपमध्ये फेरबदलाची शक्यता नाही ; फडणवीसांचा खुलासा

 

पुणे : वृत्तसंस्था । महाराष्ट्र भाजपमध्ये काहीही फेरबदलांची शक्यता नाही , राज्यातील नेते दिल्लीतील नेत्यांना राज्यातील मुद्द्यांवर दिल्लीत जाऊन भेटतात असा खुलासा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला

 काही दिवसांमध्ये राज्यातील भाजपा नेत्यांची दिल्लीवारी सातत्याने होऊ लागली होती. भाजपाचे काही प्रमुख नेते दिल्लीत पक्षातील वरीष्ठांच्या भेटी घेत असल्यामुळे राज्यातील भाजापा संघटनेमध्ये फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यातही प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या  जागी  पक्षाला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली होती. मात्र, या चर्चेला खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच पूर्णविराम दिला आहे. माजी मुख्यमंत्री आणि राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज पुण्यात एका कार्यक्रमात आले असताना पत्रकारांशी बोलताना यावर आपली भूमिका स्पष्ट केली.

 देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील भेटीगाठी महाराष्ट्राच्या प्रश्नांवर असल्याचं सांगितलं. “कोणतेही संघटनात्मक बदल नाहीत. नवीन मंत्रिमंडळ झालं आहे. नव्या मंत्र्यांच्या भेटीगाठी, काही महाराष्ट्राचे प्रश्न यासाठीच हे दौरे आहेत. महाराष्ट्रात संघटनात्मक कोणतेही बदल नाहीत”, असं ते म्हणाले.

 यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष बदलण्याची कोणतीही चर्चा नसल्याचं स्पष्ट केलं. “आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अतिशय चांगलं काम करत आहेत. पक्ष त्यांच्या पाठिशी आहेत, दिल्लीतील हायकमांड त्यांच्या पाठिशी आहेत. आम्ही सगळे त्यांच्या पाठिशी आहोत. कृपया कंड्या पिकवू नका, पतंगबाजी करू नका. चुकीच्या बातम्या करू नका. बातम्या कमी पडल्या, तर मला बातमी मागा”, असं म्हणत त्यांनी प्रसारमाध्यमांना देखील टोला लगावला.

दरम्यान, खुद्द चंद्रकांत पाटील यांनीही देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या भेटी राजकीय नव्हत्या, असं सांगितलं आहे. “या भेटींमागे काहीही राजकीय हेतू नाही. विशेषत: देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार हे नेहमी दिल्लीत येत असतात. राज्याच्या मुद्द्यांवर ते दिल्लीत येत असतात. त्या दोघांचं दिल्लीत येणं हे सामान्य आहे. दोघांनी अमित शाह यांची स्वतंत्र बैठक घेणं हे देखील सामान्य आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते आशीष शेलार यांनी शुक्रवारी स्वतंत्रपणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. शेलार यांनी संसदेत जाऊन शहा यांच्याशी चर्चा केली, तर फडणवीस यांनी मात्र शहा यांची दिल्लीत अन्यत्र भेट घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. अमित शहा यांच्याशी चर्चा करून फडणवीस लगेचच मुंबईला परतले. त्यानंतर ते संध्याकाळी उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या कार्यक्रमातही सहभागी झाले. शहा यांच्या भेटीनंतर शेलार यांनी भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांशीही चर्चा केल्याचे सांगितले जाते. फडणवीस आणि शेलार या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी अचानक केलेल्या दिल्ली दौऱ्यामुळे आणि शहांच्या भेटीबाबत गुप्तता राखण्यात आल्यामुळे राज्यातील राजकारणाबाबत तर्कवितर्क केले जात आहेत.

 

Exit mobile version