Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही; येडियुरप्पांची दर्पोक्ती

 

बंगळुरू, वृत्तसंस्था  । महाराष्ट्राला कर्नाटकातील एक इंचही जागा देणार नसल्याची दर्पोक्ती कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी केली आहे. याच मुद्यावरून त्यांनी आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे.

कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील शहिदांना अभिवादन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच, असे ठणकावून सांगितले होते. सीमा प्रश्नात सर्वस्वाची होळी करणारे हुतात्मे आणि त्यांच्या त्याग, समर्पणात होरपळूनही आजही या लढ्यात धीराने आणि नेटाने सहभागी कुटुंबियांना मानाचा मुजरा. कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते.

यात कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. कर्नाटकची एक इंच जमिनीही महाराष्ट्राला दिली जाणार नाही. निव्वळ राजकारणासाठी अशी उद्धव ठाकरे यांनी अशी वक्तव्य करणं बंद करावं, असे येडियुरप्पा यांनी म्हटले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सामाजिक सौहार्द बिघडवण्याची भाषा करणे ही अतिशय खेदाची बाब आहे. संघराज्याच्या मुख्य तत्वांचे पालन आणि त्याबद्दलची कटिबद्धता राखणे गरजेचे असते. ती राखून उद्धव ठाकरे यांनी आपण खरे भारतीय असल्याचे दाखवून द्यावे, असेही येडियुरप्पा यांनी म्हटले.

Exit mobile version