Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराष्ट्रात ३० नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला

 

मुंबई: वृत्तसंस्था । महाराष्ट्रात ३० नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. १ ते ३० नोव्हेंबर असा लॉकडाऊनचा सहावा टप्पा असणार आहे. कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन असणार आहे.

राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध गेल्या काही महिन्यांत शिथील करण्यात आले आहेत. विविध सेवा हळूहळू सुरू करण्यात येत आहेत. या सवलती यापुढेही कायम राहणार आहेत.

एकीकडे अनलॉकची प्रक्रिया वेगाने सुरू असताना दुसरीकडे कंटेन्मेंट झोनमध्ये मात्र कठोरपणे लॉकडाऊनचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. देशात आधीच ३० नोव्हेंबरपर्यंत अनलॉकच्या सहाव्या टप्प्याची नियमावली जाहीर करताना लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.

नोव्हेंबर महिन्यात दिवाळी असून या काळात गर्दी वाढून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. ती बाब ध्यानात घेऊन सरकार अनलॉकच्या बाबतीत सावधपणे पावले टाकत असल्याचेच या निर्णयावरून दिसत आहे.

राज्यात जून महिन्यापासून मिशन बिगिन अगेन अंतर्गत निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. राज्य सरकारने अनलॉकच्या पाचव्या टप्प्यात हॉटेल्स, फूडकोर्ट्स, रेस्टॉरंट आणि बार हे ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली. लोकलमधून सर्व महिलांना वेळेची अट घालून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली. पाठोपाठ वकील आणि खासगी सुरक्षा रक्षकांनाही ती सवलत मिळाली.

राज्य सरकारकडून सर्वांसाठी लोकल सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वेला दिला आहे. ही परवानगी देताना वेळांबाबतही आपली सूचना राज्य सरकारने मांडली आहे. हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला असून त्यावर येत्या काही दिवसांत निर्णय अपेक्षित आहे. सरकारने शाळा, कॉलेज आणि अन्य शैक्षणिक संस्था तसेच कोचिंग क्लासेस सुरू करण्याबाबत मात्र कोणताही निर्णय घेतलेला नाही. धार्मिक स्थळांबाबत निर्णयही लांबणीवर टाकण्यात आला आहे. राज्यात सावधगिरीने निर्णय घेण्याचे धोरण राज्याने अवलंबले आहे.

Exit mobile version