Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराष्ट्रात तीन आठवड्यांच्या कडक लॉकडाउनचे विजय वडेट्टीवारांचे संकेत

 

मुंबई : वृत्तसंस्था । राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाउन लागू करणयाचे संकेत विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.

 

 

कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून वीकेण्ड लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. एकीकडे व्यापाऱ्यांकडून निर्बंधाला विरोध होत असताना विरोधकांकडूनही निर्बंध शिथील करण्याची मागणी केली जात आहे.

 

आजपासून विकेण्ड लॉकडाउन सुरु होत असून त्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “विकेण्ड लॉकडाउनची आवश्यकता होती. रुग्णसंख्या ज्या पद्धतीने वाढत आहे हा आकडा पुढील १० दिवसांत महाराष्ट्रात १० लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मग अशा परिस्थितीत भविष्यात पूर्णच लॉकडाऊन करावा लागेल. रेल्वेवर निर्बंध आणावे लागतील, गर्दी कुठेही होणार नाही हे पहावं लागेल”.

 

पुढे ते म्हणाले की, “परिस्थिती हाताळण्यासाठी कितीही उपाययोजना केल्या तरी मनुष्यबळ कमी पडणार आहे. डॉक्टर, नर्सेस कमी पडतील. साडे पाच हजार डॉक्टर जे आता अंतिम परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना ठिकठिकाणी कामाला लावत होतो, तरीदेखील मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे वीकेण्ड नाही तर मी मुख्यमंत्र्यांना तीन आठवड्यांचा कडक लॉकडाउन लावण्यास सांगणार आहे”.

 

पुढे ते म्हणाले की, “कडक लॉकडाउन केल्याशिवाय निरपराध लोकांचे प्राण वाचवू शकत नाही. कोरोनाचा प्रसार झालेला असून अशा परिस्थितीत पूर्णत: लॉकडाउनची आवश्यकता असून मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे”.

 

“काँग्रेसचा मंत्री नाही तर आपत्ती व्यवस्थापन खात्याचा मंत्री म्हणून महाराष्ट्रात जी स्फोट परिस्थिती निर्माण झाली आहे आणि केंद्र सरकार जी सापत्न वागणूक देत आहे त्यामुळे ही मागणी करत आहे. आज मोठ्या प्रमाणात लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. गुजरातसाऱख्या राज्याला अधिकची लस दिली जाते. इतर राज्यांना महाराष्ट्रापेक्षा जास्त लस दिली जाते. महाराष्ट्रात मात्र लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ आली आहे. आम्ही मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु केलं होतं, पण आता केंद्र बंद पडल्याची वेळ आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

 

“प्रकाश जावडेकर म्हणतात महाराष्ट्राने पाच लाख लसी खराब केल्या आहेत. महाराष्ट्र तर खाली आहे. इतर राज्यं पुढे आहेत. महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं जाऊ नये अशी माझी विरोधकांना विनंती आहे. लोकांचा जीव जात असून उपाय सुचवा, त्या आम्ही करु. एमपीएससची परीक्षा रद्द केली तेव्हा भाजपा रस्यावर उतरला, त्यामुळे परीक्षेला बसणाऱ्या अडीच लाख मुलांना कोरोना झाला आहे. यामुळे परीक्षा रद्द करा अशी मागणी आता होत आहे,” असं विजय वडेट्टीवारांनी सांगितलं.

Exit mobile version