Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराष्ट्राच्या पोलिसांनी माणुसकी सोडलेली नाही – शिवसेना

मुंबई प्रतिनिधी । पोलिसांच्या कठोर भूमिकेवर टीका करणार्‍या भाजपवर जोरदार हल्लाबोल करत दंडुका हाणणे ही समाजसेवा व आरोग्यसेवाच असून महाराष्ट्राच्या पोलिसांनी माणुसकी सोडलेली नसल्याचे प्रतिपादन आज दैनिक सामनातील अग्रलेखातून करण्यात आले आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या कठोर कारवाईला आक्षेप घेतला होता. यावर आज सामनातील अग्रलेखातून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, सरकारने २१ दिवसांचे लॉक डाऊन जाहीर करूनही लोक रस्त्यावर उतरतात, गर्दी करतात. पुन्हा पोलिसांनी दंडुके उगारले तर हे कायद्याचे राज्य आहे काय असा प्रश्‍न विचारतात. होय, हे कायद्याचेच राज्य आहे. म्हणूनच पोलीस फक्त दंडुक्याचा वापर करीत आहेत. रस्त्यावर फिरणार्‍यांना पोलीस दंडुके मारतात म्हणून सरकारवर टीका केली जात आहे. मग महाराष्ट्र वाचविण्यासाठी काय करायला हवे, याचेही मार्गदर्शन टीकाकारांनी करावे. राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांना काय झाले आहे? जणू जनतेची काळजी फक्त त्यांना आहे आणि सरकार फक्त हाती दंडुका घेऊन फिरत आहे. अशी विधाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करीत आहेत. आधीच्या राजवटीत पोलिसांचा फक्त गैरवापर सुरू होता. आज फक्त कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा वापर सुरू आहे. एका व्यक्तीच्या चुकीमुळे शंभरजणांना, त्या शंभरांतून पुढच्या हजारांना कोरोना बाधणार असेल तर त्या एका व्यक्तीच्या पार्श्‍वभागावर दंडुका हाणणे ही समाजसेवा आणि आरोग्यसेवाच आहे. डॉक्टरांवर ताण आहे तसा पोलिसांवरही आहे. कर्तव्य बजावणा़र्‍या पोलिसांवर टीकेची झोड उठवून तुम्ही कोरोनाला बळ देत आहात. पण घसरलेल्या गाडीत बसणा़र्‍या विरोधकांना हे सांगायचे कोणी? महाराष्ट्रातील सर्व आमदार व खासदारांनी (भाजप वगळून) त्यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री मदतनिधीत जमा केले आहे. पण राज्यातील विरोधी पक्षाने त्यांच्या आमदार-खासदारांसाठी काय फर्मान काढावे? तर त्यांचे एक महिन्याचे वेतन त्यांनी भाजपच्या राहत कोषात जमा करायचे आहे. म्हणजे त्यांना मुख्यमंत्री व त्यांचा मदतनिधी आपला वाटत नाही. अशा विरोधी पक्षाला सामाजिक भान तर नाहीच, पण त्यांचे वागणे राष्ट्रीय एकोप्याच्या विरोधी आहे. म्हणूनच अशा कठीणप्रसंगी असे संकुचित विचारांचे लोक सत्तेवर नाहीत याचा महाराष्ट्राला अभिमान आहे.

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, पोलीस व आरोग्य यंत्रणेचे मनोबल खचेल असे कोणतेही वर्तन कोणीही करू नये. पोलीस रस्त्यांवरील मुशाफिरांना फक्त दंडुकेच मारीत नाहीत, तर इतरही बरीच चांगली कामे करीत आहेत. महाराष्ट्राच्या पोलिसांनी माणुसकी सोडलेली नाही, पण त्यांच्या हातातील दंडुके शोभेचे आहेत असे लोकांना वाटले तर लॉक डाऊनची पर्वा न करता रस्ते, बाजार गच्च भरतील आणि मग इस्पितळे कमी पडतील. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, पोलिसांनी दंडुक्यास तेल लावून काम करावे. त्यांचा हा इशारा जनहितासाठी आहे. पोलिसांना कठोर भाषा का वापरावी लागते? दंडुका का वापरावा लागतो, याचा विचार प्रमुख विरोधी पक्षाने करायला हवा. आमचा इतर सर्व विरोधी पक्षांशी चांगला संवाद आहे. या संकटकाळी त्यांचे आम्हाला चांगले सहकार्य मिळत आहे. प्रमुख विरोधी असलेल्यांनी मात्र मुख्यमंत्री मदतनिधीसारख्या महत्त्वाच्या बाबतीतही सवतासुभा केला आहे. अशा गांभीर्य नसलेल्या विरोधकांच्या डोक्यावर एखादा दंडुका पडल्याशिवाय त्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही. हा समय वादविवादाचा नाही. टीका, आरोप करण्याचा नाही. हातात हात घालून राष्ट्र आणि महाराष्ट्र वाचविण्याचा आहे. सरकारी पगार स्वत:च्या राहत कोषात जमा करणार्‍यांना हे कोणी समजावयाचे? असा सवाल या अग्रलेखात करण्यात आला आहे.

Exit mobile version