Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराष्ट्राची केंद्राकडे दीड कोटी जादा लसींच्या डोसची मागणी

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । केंद्र सरकार जुलै महिन्यात महाराष्ट्राला १ कोटी १५ लाख लसींचे डोस देणार आहे. मात्र लसीकरणाची महाराष्ट्राची क्षमता व नियोजन लक्षात घेता अधिकचे दीड कोटी डोस देण्याची मागणी आरोग्य विभागाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली आहे.

 

आजघडीला तीन कोटी तीस लाखाहून अधिक लोकांचे महाराष्ट्रात लसीकरण झाले असून २६ जून या एकाच दिवशी राज्यात ७ लाख ३८ हजार लोकांचे लसीकरण करण्यात आले होते. केंद्र सरकारने अखंडित लस पुरवठा केल्यास राज्यातील लसीकरण नियोजित वेळेत पूर्ण करता येईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. यासाठी पुरेशी लसीकरण केंद्रे तसेच लसीकरण नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. जुलै महिन्यात देशभरात १२ कोटी लस डोस वितरण होणार असून त्यापैकी १ कोटी १५ लाख डोसेस महाराष्ट्राला दिले जाणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात जुलै महिन्यात रोज सरासरी ३ लाख ७० हजार लोकांचे लसीकरण होऊ शकते. आरोग्य विभागाने रोज १० ते १२ लाख लोकांच्या लसीकरणाचे नियोजन केले आहे व आवश्यकतेनुसार १५ लाख लोकांना रोज लस देता येईल असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणे आहे. लसीचे डोस वाया जाण्याचे प्रमाणही अन्य राज्याच्या तुलनेत अत्यल्प आहे.

 

राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी २ जुलै रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांना पत्र लिहून महाराष्ट्राला दीड कोटी जादा लसीचे डोस देण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारनेच मागे एका बैठकीत राज्याच्या लस नियोजनाचे सादरीकरण करायला सांगितले होते, तेव्हा ९ लाख लसीकरणाबाबत सादरीकरण करण्यात आले होते. आम्ही २६ जून या एकाच दिवशी ७ लाख ३८ हजार लोकांचे लसीकरण करून आमची नियोजनबद्ध लसीकरणाची क्षमता दाखवून दिली आहे. आमची क्षमता व गरज लक्षात घेऊन केंद्राने आम्हाला जादाचे दीड कोटी डोस द्यावे, अशी मागणी डॉ व्यास यांनी पत्रात केली आहे.

 

महाराष्ट्राची १२ कोटी लोकसंख्या लक्षात घेता २४ कोटी डोसची गरज असून आतापर्यंत पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या ३ कोटी ३० लाख एवढी आहे. केंद्राकडून वेळेत लस पुरवठा होत नसल्याने गेल्या काही दिवसात राज्यातील अनेक भागातील लस केंद्र बंद करावी लागली होती. अशावेळी लोकांची लसीकरणासाठी भटकंती होऊन त्यांचा रोष राज्य सरकारला सहन करावा लागतो. मात्र केंद्राने लस पुरवठ्याची स्वतः ची जबाबदारी झटकत राज्यांनी योग्य नियोजन करावे असा सल्ला देत लस समस्येला राज्य सरकारेच जबाबदार असल्याची टीका केली आहे. या सर्वाचा विचार करता महाराष्ट्राला जास्तीतजास्त लसीचे डोस मिळणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

 

Exit mobile version