Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महामार्गावर रखडलेल्या रस्त्यांचे कामे त्वरीत सुरू करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव – पाचोरा – जळगाव या राष्ट्रीय महामार्गावरील वेगवेगळ्या टप्प्यांवर रखडलेल्या ९ कि. मी. रस्त्यांचे काम त्वरित सुरू करण्यासाठी पाचोरा – भडगाव मतदार संघाचे मा. आमदार दिलीप वाघ यांच्या नैतृत्वाखाली महाविकास आघाडीतर्फे दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता नांद्रा, पाचोरा, भडगाव, नगरदेवळा व कजगाव याठिकाणी एकाच वेळी सकाळी १० साखळी पद्धतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती माजी आ. दिलीप वाघ व महाविकास आघाडीतर्फे १५ फेब्रुवारी रोजी पाचोरा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलतांना मा. आ. दिलीप वाघ यांनी सांगितले की, जळगांव ते कजगाव दरम्यान ९ कि. मी. अंतरावर रस्त्यांची चाळणी झाली असुन ९ कि. मी. रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. अनेक वेळा निवेदने देवुन सुद्धा रस्त्यांचे काम होत नसल्याने रस्ता रोको सारखा पवित्रा घेण्यात येत आहे. या रस्त्यावर अनेक निष्पापांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. रस्ते भुसंपादन विभागाचे अधिकारी हे माझ्या निवासस्थानी आले असता त्यांनी समाधान कारक उत्तरे दिले नाहीत. काही आडमुठे अधिकाऱ्यांमुळेच रस्ता दुरुस्तीसाठीच २१ फेब्रुवारी रोजी भव्य रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे मा. आ. दिलीप वाघ यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी, राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी देखील या रस्त्यांच्या संदर्भात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. या आंदोलनात मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, क्षत्रिय गृपचे धनराज पाटील, संभाजी ब्रिगेडचे मुकेश तुपे, समता सैनिक दलाचे जिल्हा समन्वयक तथा महापुरुष सन्मान समितीचे कार्याध्यक्ष किशोर डोंगरे यांनी पाठिंबा दर्शविला आहे.

जळगाव ते चाळीसगाव पर्यंत अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठे मोठे खड्डे असून सदरचे काम सोडून दिलेल्या स्थितीत आहेत. तसेच रस्त्याच्या धुळीमुळे डोळ्यांना डोळ्यांच्या दुखापतींचा त्रास होत असून खड्यामुळे नागरिकांना मणक्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यासोबत वाहनांचा दुरुस्ती खर्च देखील वाढलेला आहे. शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान होत आहे. अधिकाऱ्यांनी व सत्ताधारी मंत्री खासदार, आमदार आणि वरिष्ठ नेत्यांनी या अत्यंत भयानक संकटाचा विचार करून सदर रस्त्यावरील धोकादायक ठिकाणी त्वरित डांबरीकरण करून सर्व अपघातग्रस्त ठिकाणांसह संपूर्ण रस्त्यांचे त्या स्थितीमध्ये डांबरीकरण करण्यात यावे. या रास्त मागणीसाठी २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता एकाच वेळी ५ ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. या परिषदेस पाचोरा – भडगाव मतदार संघाचे माजी आमदार दिलीप वाघ, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष तथा मा. नगरसेवक विकास पाटील, भूषण वाघ, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजहर खान, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तायडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, युवा सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप जैन, जितेंद्र जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते खलील देशमुख, रणजीत पाटील, पी. डी. भोसले, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, क्षत्रीय गृपचे धनराज पाटील, संभाजी ब्रिगेडचे मुकेश तुपे, राष्ट्रवादीचे चे युवक शहर अध्यक्ष सुदर्शन सोनवणे, राष्ट्रवादीचे भडगाव तालुका अध्यक्ष राहुल पाटील, राष्ट्रवादीचे भडगाव युवा शहर अध्यक्ष कुणाल पाटील, अभिजीत पवार भडगाव शहराचे कार्याध्यक्ष हर्षल पाटील.,(नगरदेवळा), पिंटु भोसले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version