Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महापौर जयश्री महाजन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श समाज शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

जळगाव, प्रतिनिधी | भारतरत्न डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव व देवकाई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श समाज शिक्षिका पुरस्कार महिला शिक्षण दिनाच्या औचित्याने महापौर जयश्री महाजन यांना प्रदान करण्यात आला.

 

शिक्षिका ते जळगाव महानगरच्या महापौर हा अलौकिक जीवन प्रवास व जळगावच्या सर्वांगीण सुधारणेचा ध्यास घेऊन अल्पावधीत कायापालट केल्याची दखल घेऊन महापौर तथा माध्यमिक शिक्षिका जयश्री सुनील महाजन यांना विशेष आदर्श समाज शिक्षिका पुरस्कार महापौर दालनात म .रा . माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सेवानिवृत्त विभागीय सचिव शशिकांत हिंगोणेकर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. पुरस्कारात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी कार्य दर्शविणारे आकर्षक सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच शाल,श्रीफळ आणि ग्रंथ देण्यात आले. याप्रसंगी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जिल्हा प्रमुख विजय लुल्हे , देवकाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष कलाशिक्षक सुनील दाभाडे, कुमूद प्रकाशनाच्या प्रकाशिका संगीता माळी व मेहरुणच्या जय दुर्गा प्राथमिक विद्यालयाचे उपशिक्षक महेश बच्छाव उपस्थित होते.

आपल्या सत्काराला उत्तर देतांना महापौर जयश्री महाजन म्हणाल्या की,” माननीय हिंगोणेकर साहेबांच्या हस्ते झालेला सत्कार हा ऐतिहासिक असून मला शैक्षणिक कार्यासाठी दिपस्तंभासमान अक्षय ऊर्जा देत राहील. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे आजोबा आजी अभावी संस्कार मिळणे दुरापास्त झाले आहे. अशावेळी संस्कारांचे बीजारोपण दोन्ही पिढ्यांमध्ये पुस्तक भिशी करीत असल्याबद्दल त्यांनी पुस्तक भिशी जिल्हा प्रमुख विजय लुल्हे व सहकाऱ्यांचे कौतूक केले. पुस्तक भिशी राबवित असलेल्या शैक्षणिक,सामाजिक व साहित्यिक उपक्रमांचीही त्यांनी प्रशंसा केली. हिंगोणेकर साहेबांनी ” महापौरांची डायरी ” लिहून राजकिय सत्ताकाळात केलेल्या मुल्यात्मक सामाजिक सुधारणांच्या कटू गोड अशा संस्मरणीय आठवणी लिहिण्याचे महापौरांना सांगताच मी निश्चित प्रयत्न करेन असे विनम्रपणे महापौरांनी आश्वासन दिले. जिल्हा मध्यवर्ती बँकेत बिनविरोध संचालक म्हणून निवडून आल्याबद्दल महापौर जयश्री महाजन यांचा भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी तर्फे हृद्य सत्कार जिल्हाप्रमुख विजय लुल्हे यांनी शाल ,श्रीफळ व ग्रंथ भेट देऊन केला. तसेच कुमूद प्रकाशनातर्फे संगीता माळी यांनी ग्रंथ भेट देऊन महापौर यांचा भावपूर्ण सत्कार केला .याप्रसंगी सुनील महाजन,आदर्श शिक्षक सागर झांबरे सर, महेश तायडे सर, महापौर यांचे स्वीय सहाय्यक ललित धांडे उपस्थित होते. भिशीचे सक्रीय सभासद महेश बच्छाव यांनी आभार मानले.

Exit mobile version