Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महापालिका आणि केशवस्मृती सेवासंस्था समूहातर्फे नागरिकांचे सर्वेक्षण, स्क्रिनिंग प्रारंभ

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहर आणि जिल्ह्यातही कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिका आणि केशवस्मृती सेवासंस्था समूहातील विविध प्रकल्पातील सहकाऱ्यांच्या सहयोगाने जळगावातील विविध भागात जाऊन प्रत्यक्ष सर्वेक्षण केले जात आहे.

त्यात घरोघरी प्रत्येकाची माहिती घेत त्यांचे तापमान, पल्स मोजणे तसेच आर्सेनिक अल्बम -३० होमिओपॅथिक औषधाचे वितरणही केले जात आहे. कोरोनविरुद्ध लढण्यासाठी एकीकडे शासन आणि प्रशासन सतत नागरिकांना जागृत करीत असले तरी दुसरीकडे बेजबाबदार वृत्ती आणि ‘ आपल्याला काही होत नाही ‘ अशा अतिआत्मविश्वासामुळे अनेकांना या विषाणूची लागण झाली. परिणामी, रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी दररोज वाढत गेली. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही हतबल झाली आहे.त्यात पोलीस आणि डॉक्टर्स यांच्यावर अधिक ताण पडतो आहे. हे सर्व लक्षात आल्यावर जळगाव महापालिका प्रशासनाने शहरातील विविध भागातील नागरिकांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्याचा आणि त्यांची माहिती घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हे सर्वेक्षण सुरू झाले आहे. सेवासंस्था समूहाने यात सहकार्यासाठी हात पुढे केला आणि या समूहातील सुमारे २२ प्रकल्पातील ६० सहकारी प्रत्यक्ष मैदानात उतरले. त्यांनी गुरुवारी प्रतापनगर, ढाके कॉलनी, जेडीसीसी बँक परिसर, डॉ.सहस्रबुद्धे यांच्या दवाखान्यामागील भागात घरोघरी जाऊन नागरिकांची संपूर्ण माहिती घेतली. तसेच त्यांच्या शरीराचे तापमान, पल्स मोजणी करीत त्यांच्या आजाराबद्दलही माहिती घेतली. त्यासोबतच त्यांना प्रतिबंधात्मक औषध म्हणून आर्सेनिक अल्बम – ३० या होमिओपॅथिक औषधीचेही वितरण करण्यात आले.

अभाविपचाही सहभाग
या सर्वेक्षणात विद्यार्थी चळवळीतील आघाडीची संघटना समजल्या जाणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही सहभाग घेतला आहे. काल म्हणजे बुधवारीच आपला स्थापना दिन साजरा करणाऱ्या या संघटनेच्या सुमारे १५ कार्यकर्त्यांनी आपल्या सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून पोलीस लाईन भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले.हा सर्व अहवाल नंतर संकलित होणार आहे.

Exit mobile version