Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘मविआ’चा मोर्चा हा सरकारला धडकी भरवणारा असेल – जयंत पाटील 

सांगली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उद्याचा महाविकास आघाडीचा महामोर्चा हा सरकारला धडकी भरवणारा असेल असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला.
महाविकास आघाडीच्यावतीने शनिवारी आयोजित केलेल्या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही माध्यम प्रतिनिधींना मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी राज्यकर्त्यांवर हल्लाबोल करताना पक्षाची भूमिकाही स्पष्ट केली.
महापुरुषांबद्दलच्या वक्तव्यांमागे शंभर टक्के एक अजेंडा आहे. एखादा बुरुज जर पाडायचा असेल तर त्या बुरुजाचा एका – एका दगडावर हल्ला केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आहे. आपल्या स्वाभिमानावर हल्ला करून हा बुरुज पाडण्याचा प्रकार सुरू आहे. ही वक्तव्य चुकून केली जात नाही, अज्ञानाने झालेले नाही, जाणीवपूर्वक केली जात आहेत. जुना इतिहास पुसून काढायचा, महाराष्ट्राचा वेगळा इतिहास रचायचा हे कारस्थान आहे. नवा इतिहास आपल्यापासून सुरू झाला पाहिजे असे काही लोकांना वाटते त्यासाठीच खरा इतिहास पुसून नवा इतिहास मांडण्याचे कारस्थान सुरू केले आहे असाही आरोप जयंत पाटील यांनी केला.
महापुरुषांची अस्मिता कशी भंग होईल… कमी कशी होईल यासाठी प्रयत्न होत आहे. भाजपचे लोक त्यात अग्रणी आहेत. लोकांच्या मनात तीव्र राग आहे. लोकं भाजपच्या लोकांना रस्त्यावर फिरणे मुश्कील करतील. राज्यपालांना भाजपने तात्काळ हटवायला पाहिजे होते. राज्यपाल महाराष्ट्राच्या विरोधात वागतात, त्यांच्या एकाही कृतीवर केंद्रसरकारने भूमिका घेतली नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातही महाराष्ट्रद्रोही लोक आहेत असाही आरोप जयंत पाटील यांनी केले.
गुजरातमध्ये निवडणुका होत्या म्हणून वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबससारखे प्रकल्प गुजरातला गेले. महाराष्ट्रातील तरुणांची संधी हिसकावून घेतली गेली. यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काहीच बोलत नाही. उलट तिकडे आलेल्या नवीन सरकाराच्या शपथविधीला उपस्थित राहतात. हे दुर्दैवी आहे असे स्पष्ट मत व्यक्त करतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री आपल्या राज्याबद्दल काहीही बोलतात त्याबाबतही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काही बोलत नाही. त्यांनी स्वाभिमान गहाण ठेवला आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
महाविकास आघाडी सरकार असताना म्हैसाळ योजनेमार्फत जत तालुक्यातील ६५ गावांना पाणी देण्याची संपूर्ण व्यवस्था आम्ही केली होती. या भागांना ६ टीएमसी अतिरिक्त पाणी मिळणार आहे. त्याची डिझाइनिंग पूर्णतः तयार आहे. हा विषय फक्त मंत्रिमंडळासमोर येऊन त्याला मंत्रिमंडळाच्या मान्यतेची गरज आहे. मात्र हे सरकार फक्त आमदार सांभाळण्यात व्यस्त आहे. आज सीमा भागातील अनेक गावे या सरकारच्या नाकर्तेपणामुळे इतर राज्यात जाण्याची मागणी करत आहे. हे दुदैवी आहे असेही जयंत पाटील म्हणाले.
Exit mobile version