Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मलबार हिलमधील घराची १ हजार कोटीत विक्री !

 

मुंबई : वृत्तसंस्था ।  मुंबईतील श्रीमंताचं ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलबार हिलमध्ये  १००० कोटींचा घरखरेदीचा व्यवहार झाला आहे. डी-मार्ट रिटेल चेन चालवणाऱ्या एव्हेन्यू सुपरमार्केटचे संस्थापक राधाकृष्ण दमानी यांनी हे घर विकत घेतलं आहे.

 

करोना काळात इतर क्षेत्रांप्रमाणेच रिअल इस्टेट क्षेत्रही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले. मात्र आता लॉकडाउननंतर अर्थव्यवस्था सुरळीत होत असताना हे क्षेत्रही पुन्हा एकदा उभारी घेत आहे.

 

३१ मार्चला हा व्यवहार झाला आहे. राधाकृष्ण दमानी यांनी मलबार हिलमध्ये १००० कोटींना विकत घेतलेल्या या घरासाठी ३० कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली आहे. बाजारभावानुसार य़ा घराची किंमत ७२४ कोटी रुपये आहे. ५७५२.२२ चौरस फुटांच्या घराचा हा व्यवहार सध्या रिअल इस्टेट क्षेत्रात चर्चेचा विषय आहे.

 

 

राधाकृष्ण दमानी हे ‘डी-मार्ट’चे मालक आहेत. भारतातल्या अनेक मोठ्या तसंच लहान शहरांमध्ये ‘डी-मार्ट’ च्या शाखा आहेत. ‘डी-मार्ट’मध्ये रोजच्या वापरातल्या किराणा मालासारख्या अनेक गोष्टी मिळतात. भारतातल्या किराणा मालाच्या अनेक यशस्वी चेन्सपैकी डी-मार्ट ही एक चेन आहे.

 

भारतातील श्रीमंतांच्या यादीत राधाकृष्ण दमानी यांचा समावेश आहे. नेहमी पांढरा शर्ट आणि पांढरी पँट अशी स्टाईल असणाऱ्या राधाकृष्ण दमानी यांना मिस्टर व्हाईट अँड व्हाईट म्हणून ओळखलं जातं. राधाकृष्ण दमानी हे प्रसारमाध्यमं , सोशल मीडियापासून दूरच असतात.

 

राधाकृष्ण दमानी शेअर बाजारातही गुंतवणूकदार आहेत. राधाकृष्ण दमानिया यांनी २०१७ मध्ये त्यांच्या कंपनीची शेअर बाजारात नोंदणी केल्यानंतर दोनच दिवसांत संपत्तीमध्ये ६१०० कोटी रूपयांची वाढ झाली होती.

Exit mobile version