मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्या : दरेकरांची मागणी

मुंबई प्रतिनिधी | राज्य सरकारने मराठा समाजाची जाहीर माफी मागून समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून द्यावे अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज केली आहे.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रवीण दरेकर म्हणाले की, ठाकरे सरकारने गंभीर चुका केल्यामुळे आणि सरकारच्या बेफिकीरीमुळे मराठा समाजाने असलेले आरक्षण गमावले. या सरकारमुळे सर्वोच्च न्यायालयाने सर्वप्रथम मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आणि नंतर ते रद्द केले. त्यानंतर ठाकरे सरकारने मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी कोणतेही गंभीर प्रयत्न केलेले नाहीत. या सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिकेसाठी पाठपुरावा केलेला नाही किंवा न्यायाधीश भोसले समितीने केलेल्या शिफारशींनुसार पावले टाकलेली नाहीत. हे सरकार मराठा आरक्षण हा विषयच विसरून गेल्यासारखी स्थिती आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असेच या सरकारचे धोरण दिसते अशी टीका त्यांनी केली.

दरेकर पुढे म्हणाले की, तत्कालीन फडणवीस सरकारने उच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवले. हे सरकार असेपर्यंत मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती आली नव्हती. तथापि, ठाकरे सरकारला मराठा समाजाचे अस्तित्वात असलेले आरक्षणही टिकविता आले नाही. ठाकरे सरकारने योग्य बचाव केला नसल्यामुळे गायकवाड आयोगाचा अहवाल फेटाळला गेला. मराठा समाज मागास आहे, हे आता नव्याने सिद्ध करावे लागेल व तसे करताना सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तरे द्यावी लागतील, असंही दरेकर म्हणाले.

Protected Content