Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मराठा समाजाने कोविडचा शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत थांबायचं का? — चंद्रकांत पाटील

 

कोल्हापूर : वृत्तसंस्था । मराठा आरक्षण आंदोलनाशी  कोविडचा काय संबंध? सगळं जनजीवन , भ्रष्टाचारही  सुरु आहे. मग मराठा समाजाने कोविडचा शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत थांबायचं का?,” अशी भूमिका  चंद्रकांत पाटील यांनी घेतली आहे.

 

 

मराठा आरक्षणावर संभाजीराजेंनी मांडलेल्या भूमिकेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विरोध केला आहे. शांत राहण्याची संभाजीराजेंची भूमिका मान्य नाही असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. संघर्ष केल्यास आपण शरद पवार आणि अजित पवार यांच्या पाठीशी उभे राहू असा शब्दही त्यांनी  दिला

 

मराठा आरक्षणावर संभाजीराजेंच्या भूमिकेबद्दल ते म्हणाले, “मराठा आरक्षण लगेच मिळण्यासाठी, मराठा आरक्षण मिळेपर्यंत सवलती मिळवण्यासाठी जो कोणी संघर्ष करेल त्याच्यासोबत आम्ही आहोत. संभाजीराजे तर आमचे राजे आहेत…पण संघर्ष न करता, कोविड संपल्यावर मिळालं पाहिजे असं ते म्हणाले असून आम्हाला ते मान्य नाही.

 

“पुनर्विचार याचिका दाखल करा, दोन वर्ष कायदा होता त्या काळातील तरुण, तरुणांना नोकरीचं पत्र द्या, आरक्षण मिळेपर्यंत सवलती द्या, मागास वर्ग आयोग नेमा या गोष्टी मी सांगितल्या असून त्याच गोष्टींचा पुनरुच्चार संभाजीराजेंनी केला आहे,” असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं

 

“सरकारच्या मानगुटीवर बसून आरक्षण मिळवण्याची संभाजीराजेंची भूमिका असेल तर आम्ही खांद्याला खांदा लावून आहोत. संघर्ष करुन मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका शरद पवार, अजित पवारांची जरी असेल तर त्यांच्या मागे पहिला शिपाई म्हणून मी उभा असेन,” असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी जाहीर केलं.

 

“जागतिक स्तरावर इंधनाची दरवाढ झाल्यामुळे देशातही दरवाढ होत आहे. काही राज्यांनी कर कमी केल्याने तेथे दर कमी आहेत. महाराष्ट्रातील आघाडी सरकारने कर कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा. टीका करू नये,” असा पलटवार चंद्रकात पाटील यांनी केला.

 

Exit mobile version