Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मराठा आरक्षण ; पार्थ पवारांची हस्तक्षेप याचिकेची तयारी

पुणे: वृत्तसंस्था । काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत भूमिकेविरोधात जाहीर भूमिका घेणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी सध्या न्यायालयापुढं मराठा आरक्षण प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहे अशी भूमिका घेत असल्याचे ट्विट केले आहे

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यापासून मराठा समाजात अस्वस्थता आहे. मराठा संघटनांनी लढण्याची भूमिका घेतली आहे. याच मुद्दयावरून विवेक राहाडे या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. बीड तालुक्यातील केतुरा गावातील हा तरुण आहे. आत्महत्येपूर्वी त्यानं चिठ्ठीही लिहून ठेवली आहे. याच घटनेच्या अनुषंगानं पार्थ पवार यांनी ट्वीट केलं आहे.

‘मराठा आरक्षणासाठी विवेकनं आत्महत्या केल्याचं ऐकून हादरून गेलो. अशा दुर्दैवी घटनांचं सत्र सुरू होण्याआधीच मराठा नेत्यांनी जाग व्हावं आणि आरक्षणासाठी लढायला हवं. महाराष्ट्र सरकारनंही यात तातडीनं लक्ष घालावं,’ असं पार्थ यांनी म्हटलं आहे.

‘विवेकनं आमच्या मनात पेटवलेली ज्योत संपूर्ण व्यवस्थेला भस्मसात करू शकते. एका संपूर्ण पिढीचं भवितव्य पणाला लागलंय. हे सगळं पाहता सर्वोच्च न्यायालयात जाण्याखेरीज माझ्यासमोर पर्याय नाही. सध्या न्यायालयापुढं मराठा आरक्षण प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहे. माझ्या मनात पेटलेली ही मशाल पुढं नेण्यास मी तयार आहे. विवेकला आणि त्याच्यासारख्या लाखो तरुणांना न्याय मिळावा म्हणून मी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहे,’ असंही पार्थ यांनी स्पष्ट केलं आहे.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार आपल्या परीनं लढाई लढत आहे. आता पार्थ पवारांनीही मैदानात उतरण्याची घोषणा केल्यानं राज्य सरकारची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

Exit mobile version