Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ममता बॅनर्जी यांनी गांगुलीच्या त्रासाबद्दल व्यक्त केली चिंता

 

कोलकाता, वृत्तसंस्था । बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गांगुलीची भेट घेतली. या भेटीनंतर ममता बॅनर्जी यांनी गांगुलीला हृदयविकाराच्या त्रासाबद्दल चिंता व्यक्त केली.

सौरव गांगुली सकाळी घरातील जिममध्ये असताना चक्कर आल्यासारखं झालं. त्यानंतर छातीत त्रास जाणवू लागल्यानं त्याला कोलकातामधील वूडलँडस् रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गांगुलीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर राज्यपाल जयदीप धनकर, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी गांगुलीची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

ममतांनी सौरव गांगुलीच्या भेटीनंतर बोलताना हृदयविकाराच्या त्रासाबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. “गांगुलीची प्रकृती चांगली आहे. तो आराम करत असून त्याने मी ठीक आहे की नाही? अशी विचारणा केली. मला आश्चर्य वाटतं की त्याने यापूर्वी स्वतःची चाचणी केली नव्हती. तो एक खेळाडू आहे. त्याला अशी समस्या होती, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. डॉक्टर अँजिओप्लास्टीची तयारी करत आहेत. मी डॉक्टरांचे आभार मानतो,” असं ममता म्हणाल्या.

दादाची प्रकृती सुधारत आहे- राज्यपाल

राज्यपाल जयदीप धनकर यांनीही सौरव गांगुलीची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माहिती दिली. “मी दादाला चांगल्या मूडमध्ये बघितलं. मी त्याच्याशी गप्पा मारल्या. दादाला आनंदी बघून चांगलं वाटलं. तो नेहमीप्रमाणे आनंदी होता. तो आपल्या हृदयात आहे. आपल्याला त्याच्याविषयी प्रचंड आदर आहे. तो देशासाठी खेळला आहे. त्याने आपला अभिमान वाढला आहे. मला ज्यावेळस ही बातमी कळाली, त्यानंतर रुग्णालयाच्या संपर्कात आहे. रुग्णालयाकडून दाखल केल्याची माहिती मिळाली. त्याची प्रकृती आता सुधारत आहे. त्याची प्रकृती स्थिर असून, त्याच्यावर चांगल्या पद्धतीने उपचार केले जात असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे,” असं राज्यपाल धनकर यांनी गांगुलीच्या भेटीनंतर सांगितलं.

Exit mobile version