Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ममता बॅनर्जींशी पुन्हा पंतप्रधान मोदींची टक्कर

 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी महिनाभरात दुसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मोदींच्या या दौऱ्यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील अपस्थित राहणार आहेत

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये अनेक राजकीय घडामोडी सुरु आहेत. राजकीय नेत्यांकडून आपल्या सोईसाठी पक्षबदल, आरोप प्रत्यारोप, टीका-टिप्पणी अशा अनेक गोष्टी पश्चिम बंगलाच्या राजकारणात सुरु आहेत. केंद्रीय जलमंत्रालयाच्या कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये जाणार आहेत. ममता बॅनर्जींनी २३ जानेवारीच्या कार्यक्रमात घोषणा देणाऱ्यांना सुनावलं होतं. यावेळी नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी एकत्र आल्यावर काय घडणार हे पाहावं लागणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ फेब्रुवारीला केंद्रीय जलमंत्रालयाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. पंतप्रधान नॅशनल इनस्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग विभागचं भूमिपूजन करणार आहेत. या कार्यक्रमात जलमंत्रालयाचे मंत्री गजेंद्रसिंह शेखावत देखील उपस्थित राहणार आहेत. नरेंद्र मोदी इतर विकासकामांचे देखील उद्घाटन करणार आहेत.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणाऱ्यांना झापले होते. एखाद्याला कार्यक्रमाला बोलवायचं आणि त्याची बेईज्जती करायची हे तुम्हाला शोभत नाही, अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना सुनावलं होतं. ममता बॅनर्जी यांचा हा संतप्त अवतार पाहून सर्वचजण अवाक् झाले होते.

Exit mobile version