Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मनसे – भाजप युतीचे दरेकरांचे संकेत

 

मुंबई : वृत्तसंस्था । मुंबई महापालिका निवडणुकीसाठी बुधवारी मुंबई भाजपाच्या कार्यकारिणीची महत्वाची बैठक पार पडली. फडणवीस यांनी आता मुंबई महापालिकेत भाजपची स्वबळावर सत्ता आणण्याचा चंग बांधला आहे. प्रवीण दरेकरांनी मनसे– भाजप युतीचे संकेत दिले आहेत

या निवडणुकीमध्ये भाजपची स्वबळावर सत्ता आणून दाखवू असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मात्र राजकीय वर्तुळामध्ये भाजपा एकटी लढणार की कोणासोबत युती करणार यासंदर्भात सध्या चर्चा सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपा राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती करणार का असा प्रश्न भाजपाचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आला.

दरेकर यांना भाजपा-मनसे युती होणार का यासंदर्भात विचारण्यात आलं असता त्यांनी या प्रश्नाला उत्तर देताना निवडणूक आल्यावर पर्यायांचा विचार होऊ शकतो असे संकेत देणारं वाक्तव्य केलं. “आजतरी भाजपा पूर्णपणे स्वबळावर लढण्याची तयारी आहे. निवडणूक जवळ आल्यावर पक्ष काय योग्य ती भूमिका घेईल,” असं उत्तर दरेकरांनी दिलं.

तुम्ही भाजपाच्या मुंबई भाजपाच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष आहात. भाजपाच्या मिशन मुंबईचे अध्यक्ष पद अतुल भातखळकर यांना दिलं आहे. तर या निवडणुकीमध्ये तुमच्या खांद्यांवर काही जबाबदारी दिली जाणार आहे का असा प्रश्नही यावेळी दरेकरांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना दरेकर यांनी, “मी विधानपरिषदेत राज्याचा विरोधी पक्षनेता आहे. मुंबई राज्यामध्येच आहे. त्यामुळे मी मुंबईसंदर्भातील सर्व गोष्टींमध्ये असेलच. विरोधी पक्षनेता असल्याने मुंबई काय, पुणे काय, नाशिक काय सगळीकडे जबाबदारी असणारच आहे. मी मुंबईकर असल्याने मी त्या ठिकाणी जास्त असणार आहे. मी काय मुंबईचा प्रभारी होणं अपेक्षित आहे का?,” असा उलट प्रश्न दरेकरांनी पत्रकारांना विचारला.

. योग्य नियोजन, संघटनात्मक कामाची आखणी, प्रभागनिहाय लक्ष केंद्रित करून आणि प्रतिपक्षांचे बलाबल लक्षात घेऊन धोरण ठरविण्यात येत आहे. आमदार-खासदारांसह अन्य नेत्यांवर जबाबदाऱ्या देण्यात येणार आहेत, असं फडणवीस यांनी या निवडणुकीसंदर्भात काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं.

जानेवारी महिन्यात मुंबईत मनसेचे पहिले अधिवेशन झाले. त्यात पक्षाची वाटचाल यापुढे हिंदुत्वाच्या दिशेने होईल हे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर मनसे आणि भाजपामध्ये जवळीक वाढत असल्याचे चित्र दिसून आलं.

Exit mobile version