Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मनसे अजून बॅचलर आहे- राज ठाकरे

ठाणे प्रतिनिधी । मनसेला अद्याप युतीचा स्पर्श झाला नसून आमचा पक्ष बॅचलर असल्याचे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. ते ठाण्यातील प्रकट मुलाखतीत बोलत होते.

ठाणे येथे आयोजित केलेल्या मटा फेस्टिव्हलमध्ये ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांनी आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेतली. यात त्यांनी कला, साहित्य, चित्रपट, संगीत आदींसह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांशी संबंधीत प्रश्‍नांना जोरदार उत्तर दिली. यात मनसेच्या बाबत विचारणा केली असता राज म्हणाले की, अद्याप युतीला स्पर्श झाला नसून मनसे हा बॅचलर पक्ष आहे. यात ते पुढे म्हणाले की, सध्याचं राजकारण हे बटबटीत आहे म्हणण्यापेक्षा ते विचित्र आहे, असं म्हणावं लागेल. कारण सध्या एकासोबत निवडणुका लढवायच्या दुसर्‍यासोबत सत्ता स्थापन करायची आणि सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाने विरोधी पक्षात बसायचं. हे दुर्देवी आहे, अशी अप्रत्यक्ष टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर केली.

याच मुलाखतीत, राजकारणातील कोणत्या नेत्यांचा चेहरा व्यंगचित्रासाठी परफेक्ट आहे असा प्रश्‍न विचारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा चेहरा देखील व्यंगचित्र काढण्यासाठी योग्य असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा चेहरा चांगला नसल्याचे सांगत राहुल गांधींचे वडील माजी पंतप्रधान राजीव गांधींचा चेहरा चांगला होता असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितले.

Exit mobile version