मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये अँटीजन टेस्ट किटचा उपयोग सुरू!

जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने महापौर सौ.भारती सोनवणे यांनी अँटीजन टेस्ट किटचा उपयोग करण्याचे सुचविले होते. जळगाव मनपा प्रशासनाला अँटीजन टेस्ट किट उपलब्ध झाल्या असून सोमवारी त्यांचा प्रत्यक्षात उपयोग सुरू करण्यात आला. महापौरांसह मनपा पदाधिकाऱ्यांनी कोविड केअर सेंटरला भेट देत सर्व प्रक्रिया जाणून घेतली.

जळगाव शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढत असून रुग्णांना वेळीच उपचार मिळत नसल्याने मृत्युदर देशात सर्वाधिक आहे. कोरोनाचे निदान वेळीच व्हावे आणि रुग्णांना तात्काळ उपचार मिळून त्यांचा जीव वाचावा यासाठी जळगावात देखील अँटीजन टेस्ट किटचा उपयोग करण्यात यावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी केली होती. महापौरांच्या मागणीनुसार जळगाव मनपाच्या कोविड केअर सेंटरसाठी १५०० अँटीजन टेस्ट किट दोन दिवसांपूर्वी उपलब्ध झाल्या.

महापौरांसह पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी
मनपा कोविड केअर सेंटर आणि विलगीकरण कक्षाची सोमवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी पाहणी केली. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, उपगटनेते राजेंद्र पाटील, विशाल त्रिपाठी, सचिन पाटील, विजय वानखेडे, भापसे आदी उपस्थित होते. महापौरांनी संशयीत रुग्णांशी चर्चा करून अडचणी समजून घेतल्या. समस्या सोडविण्याबाबत संबंधितांना देखील सूचना केल्या.

अवघ्या अर्ध्या तासात होणार कोरोनाचे निदान
मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये विलगीकरण केलेल्या रुग्णांची अँटीजन टेस्ट किटद्वारे तपासणी करण्यास सोमवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. सोमवारी मनपाचे कोविड केअर सेंटर, जितो, इकरा वैद्यकीय महाविद्यालय, महेश प्रगती हॉलमध्ये विलगीकरण असलेल्या १८१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. अवघ्या अर्ध्या तासात अहवाल कळत असल्याने पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार आहे. महापौर सौ.भारती सोनवणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पाहणी करून सर्व प्रक्रिया जाणून घेतली.

सोमवारी १८१ पैकी २० रुग्ण पॉझिटिव्ह
सोमवारी मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये अँटीजन टेस्टद्वारे करण्यात आलेल्या १८१ रुग्णांपैकी २० लोक पॉझिटिव्ह आले तर १६१ लोक निगेटिव्ह आले. मनपाचे डॉ.राम रावलानी, डॉ.शिरीष ठुसे, डॉ.संजय पाटील, डॉ.सायली पवार, डॉ.विजय घोलप आदींसह इतर कर्मचारी यावेळी परिश्रम घेत होते.

Protected Content