Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मद्य प्रेमींसाठी खुशखबर : ….तर राज्यात सुरू होतील दारूची दुकाने !

मुंबई प्रतिनिधी । सोशल डिस्टन्सींगचे पालन केल्यास राज्यातील वाईन शॉप्सला व्यवसायाची परवानगी मिळू शकते असे स्पष्ट संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्याने मद्यपी मंडळींना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊनमुळे मद्यप्रेमींची मोठ्या प्रमाणात कुचंबणा झाल्याचे दिसून येत आहे. सध्या ऑरेंज व ग्रीन झोनमधील काही व्यवसाय सुरू झाले असले तरी वाईन शॉप्सवरील बंदी सुरूच आहे. यामुळे नियमित घेणार्‍यांची मोठी अडचण होत आहे. यामुळे काही मद्यपींनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना घडल्या असून दारूचा काळाबाजार सर्वत्र जोरात चालत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे तळीराम अस्वस्थ झाले असतांना दारू विक्रीच्या माध्यमातून मिळणार्‍या महसुलावर पाणी सोडावे लागल्याने राज्य सरकारची आर्थिक हानी होत आहे. या पार्श्‍वभूमिवर, सोमवारी सायंकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेशी संवाद साधला असता त्यांना याबाबतचा प्रश्‍न विचारण्यात आला.

राज्य सरकारकडून अनेक गोष्टींना सूट देण्यात आली आहे. त्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र बंदी असलेल्या यादीत दारुच्या दुकानांचा उल्लेख नाही. तसंच ते कधी सुरु होणार याचाही उल्लेख नाही. तर मग नेमकं सध्या काय स्थिती आहे ? असा प्रश्‍न याप्रसंगी विचारण्यात आला. यावर काय सुरु राहणार आणि काय बंद राहणार याचा स्पष्ट उल्लेख यादीत करण्यात आला आहे. दारुच्या दुकानांचा उल्लेख नसल्याचं तुमचं म्हणणं आहे. पण मला वाटतं जर सोशल डिस्टन्सिंगचं अत्यंत योग्य पद्धतीने पालन केलं तर कोणतीही बंदी असणार नाही असे राजेश टोपे म्हणाले. यामुळे ३ मे नंतर कदाचित दारूची दुकाने सुरू होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version