Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मतदानाचा विक्रम करा : मोदींचे आवाहन

पाटणा ( बिहार ) : वृत्तसंस्था : । बिहारमध्ये अखेरच्या आणि तिसऱ्या टप्प्यातील १६ जिल्ह्यांमधील ७८ जागांसाठी मतदान होत आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी मतदारांना मोठ्या प्रमाणात मतदान करत एक नवा रेकॉर्ड करण्याचं आवाहन केलं आहे. कोरोना संकटात बिहार विधानसभा निवडणूक पार पडत आहे.

मतदानाला सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत मतदारांना मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “बिहार तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान करत आहे. सर्व मतदारांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून लोकशाही उत्सवात सहभागी होऊन एक नवा रेकॉर्ड करावा. आणि हो मास्क वापरा तसंच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करा”.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जवळपास १२ प्रचारसभांना संबोधित केलं. लोकांनी आपल्या मनात एनडीएला सत्तेत आणण्याचं पक्क केलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान नितीश कुमार सलग चौथ्यांदा आपल्याला मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्याचं आवाहन करत असून ही आपली शेवटची निवडणूक असल्याचं सांगत आहेत. अनेक प्रचारसभांमध्ये नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार एकत्र उपस्थित होते.

 

नितीश कुमार यांना आव्हान देणारे तेजस्वी यादव यांनी १५ हून अधिक प्रचारसभांना संबोधित केलं असून त्यांच्या सभेसाठी होणारी गर्दी नितीश कुमार आणि भाजपासाठी चिंतेची बाब आहे. तिसऱ्या टप्प्यात जवळपास दोन कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कोरोना संकटामुळे नक्षलग्रस्त ठिकाणं वगळता इतर ठिकाणी मतदानाची वेळ एक तासाने वाढवण्यात आली आहे.

Exit mobile version