Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

…मग शिरपूर तालुक्यात १५०० एकरवरील गांजा लागवडीची चौकशी का झाली नाही ? : अनिल गोटे

धुळे प्रतिनिधी | ड्रग्ज प्रकरणाचा उद्देश हा चित्रपटसृष्टी उत्तरप्रदेशात नेण्याचा कटाचा एक भाग असल्याचा आरोप करत आधी भाजपचा आमदार असलेल्या शिरपूर तालुक्यातील १५०० एकर क्षेत्रावर गांजाची लागवड करण्यात आल्याची तक्रार आपण करून देखील याची चौकशी का करण्यात आली नाही असा प्रश्‍न राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.

अनिल गोटे यांनी आज पत्रकारांशी वार्तालाप करतांना भाजपवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, समीर वानखेडे यांनी या ड्रग्ज प्रकरणाचा बाजार मांडलेला आहे. वानखेडेंना माझा प्रश्न आहे, की मी त्यांना स्वत: धुळे जिल्ह्यातूल शिरपुर तालुक्यात ज्या ठिकाणी भाजपाचे आमदार आहेत. तिथे १५०० एकर जमिनीवर गांजा लावल्याची सगळी कागदपत्रे पाठवली, लिखीत तक्रार केली. काय केलं त्यांनी? त्यांचे अधिकारी आले व येऊन गेले. पण त्यांचे अधिकारी निघून गेल्यानंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांनी एक ट्रक म्हणजे १० टन गांजा पकडला होता. मग समीर वानखेडे कुठं गेले? १०० ग्रॅम गांजासाठी अख्खा देश एकत्र करतात. ८५ ग्रॅम गांजा सापडला होता त्या भारती सिंग कडे दहा दिवस तेच सुरू होतं. म्हणजे टनाने जिथे उत्पादन होतं तिथे थांबवायचं नाही, त्यांनी उत्पादन करत राहायचं आणि विकायला तिकडे गेले की यांनी पकडायचं. असं काम आहे का? हा सगळा प्रकार राजकीय आहे. राजकीय द्वेषाने आहे, या बद्दल माझ्या मनात काही शंका नाही. असं नसतं तर त्यांनी शिरपुर तालुक्यात गावंगाव पिंजून काढलं असतं आणि गांजाच्या धंद्यात असलेल्या लोकांवर कारवाई केली असती.

अनिल गोटे पुढे म्हणाले की, अदानीच्या पोर्टवर २१ हजार कोटींचे मादक पदार्थ सापडले. काय झालं त्याचं पुढे? कुणावर एफआयआर दाखल केला? कुणाचा जवाब घेतला? जर शाहरूख खानच्या मन्नतवर ते जात असतील, तो आर्यन तिथे राहतो म्हणून मग जिथे अदानीच्या पोर्टवर सापडले तेव्हा ते त्यांच्या घरी हे बघायला गेले का? पंतप्रधानांचे मित्र आहेत म्हणून अदानी प्रकरण लपवायचं. हा एक डाव आणि दुसरा जे फार गंभीर आहे, की महाराष्ट्रामधील जी फिल्म इंडस्ट्री आहे, ही उचलून लखनऊला न्यायची. असे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातील फिल्म इंडस्ट्री बदनाम करण्याचा त्यांचा कुटील डाव असल्याचा आरोप अनिल गोटे यांनी याप्रसंगी केला.

Exit mobile version