Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मका बियाणे खरेदीत फसवणूक – शेतकऱ्याची कृषी विभागाकडे तक्रार

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील खेडगाव (नंदिचे) येथील शेतकऱ्यांने पाचोरा शहरातील मे. संजय कृषी सेवा केंद्रातून रब्बी हंगामासाठी मक्याचे बियाणे विकत घेऊन आपल्या साजगाव शिवारातील शेतात लागवड केली होती. मात्र १५ दिवस होऊनही मक्याचे पीक उगवले नसल्याने शेतकरी शंकर ढमाले यांनी संबंधित कृषी सेवा केंद्रावर जावून कृषी संचालकास विचारणा करण्यासाठी गेला असता त्यास संजय कृषी सेवा केंद्राच्या संचालकाने शिविगाळ करून मारहाण केली.

या बाबत शंकर सुरेश ढमाले यांनी पाचोरा पंचायत समितीचे कृषी अधिकारी एम. एस. भालेराव यांचेकडे न्याय मिळण्यासाठी लेखी तक्रार दाखल केली आहे.

शेतकरी शंकर ढमाले यांनी पाचोरा पंचायत समितीत दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे की, माझी साजगांव शिवारात गट नं. २४४ असुन मी रब्बी हंगामात मका पिकासाठी शेतीची पूर्वमशागत करून लागवड केलेली होती. परंतु सदर अदयाप १५ दिवसानंतरही आवुन आलेले नाही. सदरीत सविस्तर चौकशी केली असता मला मे. संजय कृषी सेवा केंद्र, पाचोरा यांनी सयाजी १०१४ या मका वाण पिकाचे बोगस बियाणे विक्री करण्यात आलेले आहे. मी संजय केंद्र, पाचोरा यांचेकडुन मका बियाणे विकत घेतले होते. परंतु मका उगवून न आल्याने मी संबंधीत मे. संजय कृषी सेवा केंद्र, पाचोरा चे मालक, संचालक यांना कारण विचारण्यास गेलो असता, त्यांनी मला शिवीगाळ करुन मारहाण केली. याबाबत पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये एन. सी. दाखल केली आहे.

सबब एकंदर सदरील मे. संजय कृषी सेवा केंद्र, पाचोरा यांनी मला अवैध, मुदतबाहय/कालबाह्य बियाणे आणून त्यांना माहिती असतांना देखील माझी फसवणूक करण्याचे हेतूने दिले आहे. अशा प्रकारे माझी फसवणुक झालेली असल्याने मला नुकसान भरपाई देण्यात यावी ही विनंती. तसेच संजय कृषी सेवा केंद्र, पाचोरा यांची चौकशी करण्यात येऊन कारवाई करण्यात यावी ही विनंती. अशा आषयाचा तक्रारी अर्ज पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे व पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये शंकर ढमाले यांनी दिला आहे.

पंचनामा करून वरीष्ठ पातळीवर पाठविण्यात येईल – कृषी अधिकारी एम. एस. भालेराव

शेतकऱ्याचे मका बियाण्याची उगवण न झाल्याची तक्रार आमच्या कडे आलेली आहे. याबाबत शेतकऱ्याचे शेतावर जाऊन राज्य शासनाचे उपविभागीय कृषी अधिकारी, पाचोरा पंचायत समितीचे कृषी अधिकारी, संबंधित कंपनीचा प्रतिनिधी असे पथक प्रत्यक्ष जाऊन पंचनामा करतील व संबंधित कागदपत्रे वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात येईल अशी माहिती कृषी अधिकारी एम. एस. भालेराव यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.

Exit mobile version