Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मकर संक्रांतीपासून श्रीराम मंदिरासाठी जमा करणार वर्गणी !

नवी दिल्ली । अयोध्येतील नियोजीत श्रीराम मंदिरासाठी सर्वसामान्य भारतीयांचा हातभार लागावा म्हणून विश्‍व हिंदू परिषदेतर्फे कुपनच्या माध्यमातून मकर संक्रांतीपासून वर्गणी जमा करण्यात येणार आहे.

विश्‍व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष आणि रामजन्म भूमी तीर्थस्थानचे सचिव चंपत राय यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, अयोध्येत उभारलं जात असलेल्या भव्य राम मंदिरासाठी देशातील प्रत्येक रामभक्ताची मदत घेतली जाणार आहे. यासाठी विश्‍व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते घराघरात जाणार आहेत.

आगामी मकरसंक्रांतीच्या म्हणजेच १५ जानेवारीपासून विहिंपचे कार्यकर्ते देशात घरोघरी जाऊन वर्गणी जमा करणार आहेत. देशातील चार लाख गावांमध्ये जवळपास ११ कोटी कुटुंबियांपर्यंत पोहोचण्याची विहिंपची मोहीम आहे. देशातील प्रत्येक जात, समाज आणि पंथाच्या नागरिकांचा देशातील या भव्य मंदिराला हातभार लागला पाहिजे, अशी यामागची संकल्पना आहे.

याच्या अंतर्गत देशातील नागरिकांकडून ऐच्छिक स्वरुपात वर्गणी जमा केली जाणार आहे. यासाठी १०, १०० आणि १००० रुपयांचे कूपन तयार करण्यात आले आहेत. वर्गणी देणार्‍या प्रत्येक रामभक्ताला श्री रामाचा फोटो दिला जाणार असल्याचंही राय म्हणाले.

Exit mobile version