Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भ्रष्ट , जातीयवादी शरद पवार नको होते म्हणून मी उदघाटन केले — आमदार गोपीचंद पडळकर

 

मुंबई : वृत्तसंस्था ।  शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याकडून आहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण होऊ नये अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती म्हणून आपण छुप्या पद्धतीने या पुतळ्याचं अनावरण केल्याचं आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं

 

जेजुरी गडावर उभारण्यात आलेल्या अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं असून यावरुन राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उद्या म्हणजेच शनिवारी या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार होतं. मात्र त्याआधीच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पहाटे भाजपा समर्थकांसहीत गडावर जाऊन मेंढपाळांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण केलं. काही दिवसांपूर्वीच हा पुतळा उभारण्यात आला असून कोरोनामुळे मागील वर्षापासून त्याचा अनावरण सोहळा रखडला होता. मात्र पडळकर यांनी पवारांच्या हातून उद्घाटन नियोजित असतानाच स्वत: जाऊन या पुतळ्याचं उद्घाटन केलं.

 

या उद्घाटनानंतर पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. आहिल्याबाईंचं काम हे बहुजन समाजाबरोबरच समाज कल्याणासाठी होतं. त्यामुळे पवारांच्या हस्ते पुतळ्याचा आणि आमच्या भावनांचा अपमान होऊ नये म्हणून आम्ही गनिमी काव्यानं जाऊन पुतळ्याचं अनावरण केल्याचंही पडळकर म्हणाले.

 

जेजुरी संस्थानच्या वतीने हा पुतळा उभारण्यात आला आहे

 

शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते अनावरण करणं ही अपमानास्पद बाब असून आहिल्यादेवींच्या विचारांच्या उलट शरद पवार यांचं काम आहे. त्यांनी त्यांचे हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लावू नयेत. त्यामुळेच आम्ही युवा कार्यकर्त्यांच्या सोबत जेजुरीमधील अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी गडावर आलोय असं गोपीचंद पडळकर म्हणाले. यासंदर्भातील व्हिडीओ पडळकरांच्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलाय.

 

यापूर्वीही पडळकर यांनी शरद पवारांवर टीका करताना त्यांची तुलना कोरोनाशी केली होती. “शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे,” असं पडळकर यांनी पंढरपूरमध्ये  म्हटलं होतं.

Exit mobile version