Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भोकर येथील बेपत्ता विद्यार्थ्यांचा शेतात आढळला मृतदेह

जळगाव प्रतिनिधी । तीन दिवसांपासून बेपत्ता असलेला ११ वर्षीय विद्यार्थ्यांचा गावापासून हाकेच्या अंतरावरील शेतात मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. त्याचा गळा दाबून खून करण्यात आल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे. रोहित नवल सैंदाणे (वय-११) रा. भोकर ता. जळगाव असे मयत मुलाचे नाव आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी करून माहिती जाणून घेतली. रविवारी या विद्यार्थ्याचे अपहरण करणार्‍या संशयिताचे रेखाचित्र जारी करण्यात आले होते. रेखाचित्रातील संशयिताने बालकाचा खून केल्याची शक्यता व्यक्त आहे. डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक कारण समोर येत आहे.

भोकर गावापासून 500 मीटरच्या अंतरावर राजेंद्र शिवलाल सोनवणे रा. जळगाव यांचे मालकीचे शेत आहे. भगवान वामन सोनवणे यांनी हे शेत करायला घेतले असून शेतात मका लावला आहे. मक्याला पाण्यासाठी देण्यासाठी भगवान सोनवणे सोमवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास शेतात आले. यावेळी शेतातून जाणार्‍या पायवाटेवर बालकाचा अर्थनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यांनी तत्काळ याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे जितेंद्र पाटील यांना माहिती. जितेंद्र पाटील यांनी वरिष्ठांना प्रकार कळविला.

बालकाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यावर अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपपोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बापू रोहम यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठले. मृतदेहाची ओळख पटविली असता तो, 12 तारखेपासून भोकर गावातून बेपत्ता असलेल्या रोहित नवल सैंदाणे या विद्यार्थ्यांचा असल्याचे समोर आले. तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश चव्हाण, पोलीस उपनिरिक्षक निशिकांत जोशी यांच्यासह कर्मचारी विश्‍वास मराठे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.

बेपत्ता झाल्यानंतर तालुका पोलीस ठाण्यात अपहर झाल्याबाबत करण्यात आली आहे. तपास अधिकारी निशिकांत जोशी यांनी गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. दुचाकीवर बसवून नेल्याची माहिती मिळाली होती. ज्या दुकानदारांनी रोहितला घेवून जाणार्‍यांना बघितले होते. त्यांनी सांगितल्यानुसार रविवारी संशयिताचे रेखाचित्र जारी करण्यात आले होते. आणि दुसर्‍या दिवशी सकाळीच रोहितचा मृतदेह आढळून आला आहे. वैद्यकीय अधिकार्‍यांनी शवविच्छेदन केले. यात डोक्याला आतून गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे.

रोहित हा गावातील आर.एन.लाठी विद्यालयात पाचवीच्या वर्गात शिकत होता. 12 रोजी गल्लीत असलेल्या लग्नात रोहित सायंकाळी 5 वाजेपर्यंत हजर होता. सकाळपासून त्याचा मित्र वैभव हा त्याच्या सोबत होता. यानंतर सायंकाळी रोहितचे वडील कामाहून परतल्यावर रोहित घरी नसल्याने शंका आली. शोध घेतला असता तो मिळून आला नाही. त्यामुळे त्याचे अपहरण झाल्याची तक्रार रोहितचे वडील नवल सैंदाणे यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Exit mobile version