Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळ जंक्शनवरून धावली गोरखपूरसाठी श्रमिक एक्स्प्रेस

 

जळगाव, प्रतिनिधी । लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परप्रांतीय प्रवाशांना दिलासा देत भुसावळ जंक्शनवरून शुक्रवारी पुन्हा ७४८ प्रवाशांना घेवून ०१८५० श्रमिक एक्स्प्रेस गोरखपूरसाठी रवाना झाली. सुमारे दिड महिन्यांपासून भुसावळसह जळगाव, धुळे तसेच बुलढाणा भागात अडकलेल्या परप्रांतीय प्रवाशांना या गाडीमुळे मोठा दिलासा मिळाला.

जंक्शनवरून दुसर्‍यांदा सुटली गाडी

बुधवार, ६ मे राजी प्रथमच भुसावळ रेल्वे स्थानकावर लखनऊसाठी गाडी सोडण्यात आली होती तर शुक्रवार, १५ मे रोजी पुन्हा परप्रांतीय प्रवाशांना गोरखपूर जाण्यासाठी विशेष श्रमिक ट्रेन रवाना करण्यात आली. तत्पूर्वी बुलढाणा, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातून परप्रांतीय मजुरांना विविध आगाराच्या एस. टी. बसेसव्दारे भुसावळात आणण्यात आले होते. सायंकाळी त्यांना रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सचे काटेकोर पालन करून रेल्वे स्थानकात आणण्यात आले.  उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी किरण सावंत पाटील, प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्यासह संबंधित प्रांताधिकारी यांच्या नियोजानुसार जिल्ह्याच्या विविध तालुक्यातुन आलेल्या सर्व परप्रांतीयांची हजेरी घेण्यात आली. तर प्रवाशांना प्रवासाची तिकीटे शासनाकडून काढून देण्यात आली.

चोख बंदोबस्त

रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाचे वरीष्ठ आयुक्त क्षितीज गुरव, डीवायएसपी गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, भुसावळ शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, जीआरपी निरीक्षक दिनकर डंबाळे, आरपीएफ निरीक्षक दिनेश नायर आदींनी बंदोबस्त चोख ठेवला होता. दरम्यान, यावेळी स्टेशन संचालक जी.आर.अय्यर तसेच रेल्वे अधिकारी व कर्मचारी आदींचीही उपस्थिती होती.

नोंदणी १७६३ प्रवाशांची तथापी ७४८ प्रवासी दाखल

या रेल्वेने जाण्यासाठी एक हजार ७६३ प्रवाशांनी गोरखपूरसाठी नोंदणी केली होती. तथापि शुक्रवारी दुपारपर्यंत ७४८ प्रवासी दाखल झाल्याने त्यांना रवाना करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी ६.४५ वाजता गोरखपूरकडे गाडी रवाना झाली. उर्वरित प्रवाशांसाठी लवकरच दुसरी रेल्वे गाडी सोडण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी यावेळी सांगितले. रेल्वे स्टेशन वरून गाडी निघताना प्रवाशांनी भारत माता की जय चा जयघोष केला. या प्रवाशांना आपल्या मुळगावी जाण्यासाठी महसुल, रेल्वे व पोलीस दलाचे अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version